माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याच्या बातम्या दर महिन्याला समोर येत आहेत. कधी शिवसेनेचे आमदार विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने नाराज
असल्याच्या बातम्या येतात, तर कधी काँग्रेस मंत्री राज्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात काँग्रेसला गृहित धरलं जात नाही, पुरेसा निधी मिळत नाही, या तक्रारीने नाराज असल्याच्या बातम्या समोर येतात. महाविकास आघाडीतील ही धुसफूस अद्यापही कमी झालेली नाही.
विशेष म्हणजे ही धुसफूस अजूनही तशीच धगधगती असल्याचं चित्र आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका विधानावरुन काँग्रेस सरकारमध्ये सहभागी असूनही समाधानी नसल्याचं जाणवत आहे.भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी
महाविकास आघाडीसोबत सत्तेत आहोत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना या सरकारमध्ये यायचं नव्हतं. मात्र भाजपला सत्तेपासून दूर करायचं होतं. त्यामुळेच आम्ही यांच्यासोबत आलो. त्यामुळेच सोनिया यांनी सांगितलं होतं की,
आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नको, पण पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, अशी अट घातली होती”, असं विधान नाना पटोले यांनी बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात केलं.महाविकास आघाडीत सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकदा
मंत्र्यांमध्ये मतभेद आणि नाराजी असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पण काँग्रेस महाविकास आघाडीच्या इतर दोन घटकपक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यापासून मनोमनी आणखी दूर
जाण्यामागचं खरं कारण म्हणजे देशात भाजपला पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीची सुरु असलेली चर्चा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मुंबईत येऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या
दिग्गज नेत्यांना भेटून गेले. पण ते काँग्रेस नेत्यांना भेटले नाही. याचाच अर्थ देशात स्थापन होणारी तिसरी आघाडी ही काँग्रेसच्या नेतृत्वात नसण्याची चिन्हे आहेत. त्यातूनच काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे.