माय महाराष्ट्र न्यूज:बारावीच्या परीक्षेला पेपरफुटीचे ग्रहण लागले असून, शनिवारी घेण्यात आलेला रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याचे उघड झाले. या प्रकरणी मालाडमधील एका खासगी क्लासचा मालक
असलेल्या मुकेश धनसिंग यादव याच्यावर गुन्हा दाखल करून विलेपार्ले पोलिसांनी त्याला अटक केली, तर तीन विद्यार्थिनींचीही चौकशी करण्यात आली.मालाड येथे एका विद्यार्थिनीच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून ही पेपरफुटी बाहेर आली. या
गुन्ह्यात इतर काही आरोपींची नावे समोर आल्याने त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याने याबाबत अधिक तपशील सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालाडच्या संबंधित विद्यार्थिनीला विलेपार्ले येथील साठे कॉलेजचे परीक्षा केंद्र आले होते. शनिवारी पेपर सुरू होऊनही ती परीक्षा केंद्रातील वर्गात आली नव्हती. ही बाब तिथे उपस्थित एका सुपरवायझर
शिक्षकाच्या निदर्शनास आली. काही वेळानंतर शौचालयातून काहीतरी आवाज आल्याने या शिक्षकाने तिथे जाऊन पाहणी केली असता, संबंधित विद्यार्थिनी शौचालयातून बाहेर येत होती.परीक्षेला उशिरा आल्याबाबत तिच्याकडे विचारणा केली असता तिने उडवाउडवीची
उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या शिक्षकाला तिचा संशय आला. त्याने तिचा मोबाईल ताब्यात घेतला. या मोबाईलमधील व्हॉट्सअॅपवर तिच्या खासगी क्लासेसचा ग्रुप होता. याच ग्रुपमध्ये शनिवारी सुरू असलेल्या रसायनशास्त्राच्या पेपरमधील
एमसीक्यूचे प्रश्न आढळले. त्यामुळे पेपर फुटल्याचे निदर्शनास येताच या शिक्षकाने ही माहिती परीक्षा मंडळातील अधिकार्यांना दिली. त्यानंतर या अधिकार्यांनी तिथे धाव घेऊन या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली होती.
चौकशीअंती या विद्यार्थिनीला तो पेपर मुकेश यादव याने दिल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या अधिकार्यांनी विलेपार्ले पोलिसांना हा सांगून संबंधित आरोपीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. याप्रकरणी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा कलमांतर्गत
गुन्हा दाखल होताच एका विशेष पथकाने मालाड येथून मुकेश यादवला अटक केली. मुकेश मालाड येथील राणी सती मार्गावरील इंदिरानगर परिसरात राहत असून त्याच्या मालकीचा एक खासगी क्लास आहे. याच क्लासमध्ये ही मुलगी खासगी शिकवणीसाठी येत होती.
बारावीत शिकणार्या सतरा विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप असून याच ग्रुपमध्ये परीक्षेपूर्वी मुकेशने रसायनशास्त्राचा पेपर व्हायरल केला होता. याच गुन्ह्यात अन्य दोन विद्यार्थिनींची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर
त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. अटकेनंतर यादवला स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.