माय महाराष्ट्र न्यूज:शेतकऱ्यांची मागणी व अडचणींचा विचार करता शेतकऱ्यांना त्वरीत दिलासा देण्याच्या दृष्टीने वीज पुरवठा खंडीत केलेल्या कृषी ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच पुढील 3 महिने या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. तसेच थकबाकीपोटी कृषी ग्राहकांची वीज जोडणी खंडीत करण्याची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय घेण्यात
आल्याचं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काल विधानसभेत स्पष्ट केलं. त्याचवेळी राऊत यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबतची महत्त्वाची घोषणाही केली आहे. कृषी ग्राहकांना दिवसा वीज देण्यासंबंधी
तांत्रिक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीस 1 महिन्यात अहवाल देण्याच्या सूचना देण्यात येतील, असं राऊत यांनी म्हटलं आहे.ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काल विधानसभेत एक निवेदन सादर केलं होतं.
त्यात ही घोषणा करण्यात आली आहे. यंत्रमाग तसेच विदर्भ आणि मराठवाडा येथील उद्योगांना मिळणारी सबसिडी पूर्ववत करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.दरम्यान महावितरण कंपनीने घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक
ग्राहकांकडील थकबाकी वसूलीसाठी थकबाकीदार ग्राहकांना हप्त्याने थकबाकी भरण्याची सुविधा दिलेली आहे. वसूलीसाठी पाठपुरावा करणे, ठिकठिकाणी वीज बिल दुरुस्तीसाठी शिबिरे आयोजित करणे अशा विविध उपाययोजना करताना
जे दर महा नियमित बिल भरतात त्यांना 2 टक्के रिबेट दिले आहेत. या उपाययोजनांमुळे जानेवारी 2022 अखेर चालू देयकांच्या वसूली व्यतिरिक्त थकबाकी वसूल करुन घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक ग्राहकांची थकबाकी कमी होऊन आता 5,452 कोटी इतकी झाली आहे.
याशिवाय कायमस्वरुपी खंडीत असणाऱ्या ग्राहकांकडील थकबाकी 6,423 कोटी वसूलीकरिता “विलासराव देशमुख अभय योजना” महावितरण कंपनीद्वारे नुकतीच जाहीर केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.