माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतून सर्वाधिक कामे सध्या अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहेत. या राष्ट्रीय वयोश्री योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली.
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय वयोश्री योजनेचे मोफत साहित्य साधने वितरण प्रसंगी खासदार डॉ सुजय विखे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे ह्या होत्या.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, राजकारण करत असतांना लोकांच्या कामांसाठी स्वतःच्या खर्चातून आम्ही कामे करतो. परंतु लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतो.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून लोकांसाठी महाविकास आघाडी सरकारने स्वतःच्या खिशातून एक रुपयाही खर्च कधी केला नाही. गरिबांच्या कल्याणकारी योजना सुद्धा त्यांना राबवता आली नाहीत.
टक्केवारी मिळवण्यासाठी सत्तेचा वापर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. गोर गरिबांच्या कामासाठी सत्तेचा वापर आपण करतो कोणाच्या ताटातील अन्न खाण्यासाठी राजकारण करत नाही, असा टोलाही खासदार डॉ सुजय विखे यांनी लगावला.
खासदार विखे पुढे म्हणाले, की आमच्याकडून वेळप्रसंगी लोकांच्या कामांसाठी स्वतःच्या खर्चातून कामे मार्गी लावले जातात. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांची विकासकामातील टक्केवारीची रक्कम दिवसंदिवस वाढत आहे.
आम्हाला सत्ता हवी आहे ती फक्त लोकांच्या प्रामाणिक कामासाठी. अनेक लोक माझ्यावर आरोप करून शिंतोडे उडवतात मला याचा काही फरक पडत नाही. मी प्रामाणिक काम करतो. कोणाच्या ताटातील घेत नाही. त्यामुळे मला कोणाची भीती नाही, असे खासदार डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.