माय महाराष्ट्र न्यूज:कुटुंब नियोजनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी देण्यात आलेल्या नव्या संचाचा वापर करण्यास आशासेविकांनी नकार दिला आहे. आशासेविकांवर ग्रामीण भागांमध्ये कुटुंब नियोजनाचा
प्रचार करण्याच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आत्तापर्यंत या सेविकांना माहिती देण्यासाठी विविध चित्रांचे तक्ते देण्यात आले होते. त्याचा वापर करून कुटुंब नियोजनासाठी
कोणती सुरक्षित साधने उपलब्ध आहेत आणि याचा वापर कसा करावा याची माहिती नवविवाहित जोडप्यांना देण्यात येत असे. आरोग्य विभागाने कुटुंब नियोजनाची माहिती देण्यासाठी नवे संच
आशासेविकांना दिले असून यात रबरी लिंगाचा समावेश आहे. त्याच वापर करून माहिती देणे आशासेविकांना लाजिरवाणे वाटत असून त्यांनी त्याद्वारे समुदेशन करण्यास विरोध केला आहे.
आशासेविकांना समुपदेशनासाठी नवे संच वापरणे सोयीस्कर वाटत नाही. सरकारने तरीही सक्ती केल्यास हे संच आशासेविका घेणार नाहीत. यामुळे आशासेविकांच्या कुटुंबामध्ये वाद होऊ लागले
आहेत, असे आशासेविका व गट प्रवर्तक समितीच्या शुभा शमीम यांनी सांगितले.कुटुंब नियोजनाच्या साधनांचा वापर करण्यापूर्वी शास्त्रीय माहिती देणे गरजेचे आहे. २५ हजार आशासेविकांना
आतापर्यंत हे संच दिले आहेत. यात तांबी, गर्भनिरोधक गोळय़ा, निरोध, नसबंदी या सर्वाची माहिती दिलेली आहे. याव्यतिरिक्त गर्भाशयाचे प्रतिरूपही दिलेले आहे. जोडप्याला सखोल शास्त्रीय माहिती देणे अपेक्षित आहेत.
आशासेविका आणि इतरांनीही रबरी लिंगाद्वारे समुपदेशन करण्याबाबत गैरसमज करून घेऊ नये, असे आरोग्य आयुक्तालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.