माय महाराष्ट्र न्यूज:भाजपाला थोपवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात असताना आज दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत
महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. देशातील सध्याच्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार यांनीच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव
बैठकीत मांडण्यात आला. या बैठकीला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. सर्वानुमते शरद पवारांनी नेतृत्व करावं यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशातील सर्वात अनुभवी संसदीय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी संरक्षण आणि कृषी मंत्री म्हणून देशाच्या विकासात उल्लेखनीय
योगदान दिलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. सध्या देशात सर्व बिगर-भाजप राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना एकत्र
आणण्यात शरद पवार हे मोठी भूमिका बजावू शकतात”, असं मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी या बैठकीत व्यक्त केलं.