माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ग्रामदैवत समर्थ बाबुराव पाटील महाराज यांच्या यात्रा उत्सवाला इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाने प्रारंभ झाला.
तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर सालाबादप्रमाणे पहिल्यांदाच देवळाली प्रवरात कीर्तन सेवेसाठी महाराज आले.करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर यात्रेला प्रारंभ होत असल्याने नागरिकांनी
किर्तनाला उदंड प्रतिसाद दिला. नेहमीप्रमाणेच महाराजांनी समाजाची होत असलेली अधोगती व बिघडत चालेली तरुणपिढी या विषयावर उपस्थितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.
ते म्हणाले, पाठ्यपुस्तकातून भगवद्गिता व संस्कृत भाषा गायब झाली आहे. यामुळे नवीन पिढीला अध्यात्माची ओळख राहिली नाही. त्यामुळे तरुण व्यसनाधीन होऊन अधोगतीला लागले.कीर्तनकार महाराज
देखील समाजप्रबोधन करण्याऐवजी पाकिट देणारांचे गुणगाण गातात. आधी स्वतः बदला तरच समाज बदलेल. आपण करोनाच्या तिसर्या लाटेतून वाचलो आहोत. त्यामुळे आपण खरचं भाग्यवान आहोत.
ऑनलाईन शिक्षण पध्दती बंद होऊन ऑफलाईन शिक्षण झाले पाहिजे व पालकांनी आपल्या मुलांच्या हातातील मोबाईल काढून घेतला तरच भावीपिढी सुधारेल. यासाठी विज्ञानाला
अध्यात्माची जोड द्यावी लागेल, असे ते म्हणाले.