माय महाराष्ट्र न्यूज:जिममध्ये एका व्यावसायिकाशी झालेली ओळख बॉलिवुडच्या एका अभिनेत्रीला चांगलीच महागात पडली आहे. संबंधित व्यावसायिकानं बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन हिची तब्बल सव्वाचार कोटींची
फसवणूक केली आहे. तीन महिन्यात 30 टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून आरोपीनं रिमी सेनला गंडा घातला आहे. या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी आर्थिक फसवणुकीसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.रोनक जतीन व्यास असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून तो मूळचा
अहमदाबाद येथील रहिवासी असून सध्या गोरेगाव येथील नास्को गार्डन परिसरात वास्तव्याला आहे. आरोपी रोनक व्यास याची गुजरातमध्ये ‘फोमिंगो बेव्हरेज’ नावाची कंपनी आहे. ही कंपनी
कमॉडिटी व्यवसायात गुंतवणूक करण्याचं काम करते, असा दावा अभिनेत्री रिमी सेननं केला आहे. या प्रकरणी रिमीने शुभमित्र स्वपनकुमार सेन या तिच्या खऱ्या नावाने खार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस सविस्तर तपास करत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोनक व्यास याची 2019 मध्ये अंधेरीतील एका जिममध्ये अभिनेत्री रिमी सेनशी ओळख झाली होती.
या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं होतं. त्यानंतर आरोपीनं तीन महिन्यात 30 टक्के परतावा देण्याचं आमिष अभिनेत्रीला दाखवलं होतं. त्यानुसार अभिनेत्री रिमीने आपल्या चित्रपट निर्मिती कंपनीच्या माध्यमातून
आरोपीच्या कंपनीत चार कोटी 14 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.पण या रकमेवर मिळणारा नफा किंवा मूळ रक्कमही तिला परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर
रिमीने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. अभिनेत्रीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोनक व्यास विरोधात आर्थिक फसवणुकीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस याचा शोध घेत आहेत.