माय महाराष्ट्र न्यूज:नवीन वर्षात 9 पैकी 4.5 नक्षत्रांचाच पाऊस पडेल. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात चांगला पाऊस पडेल तर शेवटचे दोन महिने अल्प प्रमाणात पाऊस पडणार
असल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती असेल, असे भाकीत लोणीचे ग्रामपुरोहित जितेंद्र धर्माधिकारी यांनी ग्रामसभेत केले.अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे गुढी
पाडव्याची 105 वी ग्रामसभा शनिवारी पार पडली यावेळी जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील हे उपस्थित होते.
यावेळी ग्रामपुरोहित धर्माधिकारी यांनी दाते पंचांगाच्या आधारे नूतन वर्ष कसे राहील याचे भाकीत करताना सांगितले की, येत्या पावसाळ्यात जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल.
मृग, आर्द्रा, पुनर्वसू व पुष्य नक्षत्राचा पाऊस पडेल. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या वेळेवर होतील व पीक पाणी समाधानकारक राहील. मात्र सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अत्यल्प पाऊस पडणार
असल्याने त्याचा रब्बी हंगामावर परिणाम होऊन उत्पादनात घट होईल. पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवेल. सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या पूर्वार्धात चांगला पाऊस तर उत्तरार्धात अल्प पाऊस पडणार आहे.
मात्र नवीन उद्योग-व्यवसायासाठी नवीन वर्ष आशादायी व फलदायी असेल.