माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र मध्ये शिक्षकांनी दहावी-बारावीचे पेपर तपासण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दहावी-बारावीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान, आता निकालाबाबतची
महत्वाची बातमी हाती आली आहे.दहावी-बारावीचा निकाल 10 जूनपूर्वी लावण्यात येणार आहे. एका शिक्षकाकडे 250 पेपर तपासणीची जबाबदारी असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. पण, बोर्डाकडून आता राखीव 12 हजार शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. एका शिक्षकाला 200 ते 250 पेपर तपासणीसाठी दिले आहेत.
पुणे राज्य शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार, 12वी चा निकाल 10 जून आणि त्यानंतर 10वीचा निकाल जाहीर केला जाईल. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी
त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पेपर तपासायचे नाहीत, अशी भूमिका घेतली असली तरी पुरेसे मनुष्यबळ असल्याने तपासणी आणि निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येणार नाही.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र किंवा इयत्ता 12 ची परीक्षा 4 मार्च रोजी सुरू झाली आणि 7 एप्रिल रोजी संपेल. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा इयत्ता 10वीची परीक्षा 15 मार्चपासून सुरू झाली आणि शेवटचा पेपर 4 एप्रिल रोजी आहे.
शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरू झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर
करू. आणि दहावीचा निकाल आठ दिवसांनी लागेल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.