माय महाराष्ट्र न्यूज:भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कोल्हापूरात सभेदरम्यान दगडफेक केल्याचा आरोप केल्यानंतर करुणा शर्मा यांनी सुद्दा अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. अशातच राजकीय नेत्यांकडून खळबळजनक आरोप केले जात आहेत.कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या
पोटनिवडणुकीमध्ये शिवशक्ती सेनेतर्फे करुणा शर्मा मुंडे यांनी सुद्धा अर्ज दाखल केला आहे. दरम्यान शर्मा यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. आरोप करताना त्या म्हणाल्या की, बिंदू चौकात प्रचाराचा
नारळ फोडण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीत येऊन बसला. कार्यकर्त्यांनी त्याला विचारणा केली असता त्याने आरडाओरडा केला. त्यानंतर त्याने कार्यकर्त्यांला गाडीतच मारहाण केली, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.
याशिवाय कोल्हापूरमध्ये प्रचार करत असताना ही अज्ञात व्यक्ती वारंवार माझा पाठलाग करत आहे. मी ज्या ज्या ठिकाणी सभा घेते त्या ठिकाणी ही व्यक्ती दिसून येते, असा आरोपही करुणा शर्मा यांनी केला आहे.
‘राज्यात महिला सुरक्षित नाही, ही गुंडागर्दी कधी थांबणार आहे, यासाठीच मी उत्तर कोल्हापूरमध्ये निवडणूक लढवत आहे. पण, त्यामुळे माझ्यावर दबाव टाकला जात आहे. मला पोलीस सुरक्षा मिळावी यासाठी मी
अर्ज केला होता. राज्यपालांकडेही अर्ज केला होता होता. त्यांनी तो अर्ज गृहखात्याकडे दिला आहे, पण राज्यपालांनी सांगूनही सरकारकडून मला सुरक्षा पुरवण्यात येत नसल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा आपल्या सभेत दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. भाजपा उत्तर कोल्हापूरचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ ही सभा सुरु असताना दगडफेक झाली असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे.