माय महाराष्ट्र न्यूज:येत्या काही दिवसात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर नव्या फेरबदलात आपल्या वाट्याला मंत्रिपद यावे म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही हायकमांडकडे सेटिंग लावल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिल्यानंतर नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं होतं. मात्र, प्रदेशाध्यक्षपदासह मंत्रीपदही देण्यात यावं अशी पटोले यांची मागणी होती. त्यावेळी पटोले यांची ही मागणी पूर्ण करण्यात आली नव्हती.
त्यामुळे आता नव्या फेरबदलावेळी पटोले यांची ही मागणी पूर्ण करण्यात येणार का? आली तर पटोले यांच्याकडे कोणतं खातं दिलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेली ईडी, सीबीआय, आयकर विभागाची कारवाई, काही मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे मंत्रिमंडळातील रिक्त झालेली पदे, निधीचा असमतोल
वाटप आणि विकास प्रकल्प या सर्व मुद्द्यांवर येत्या 8 किंवा 9 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची बैठक होत आहे. कोरोनाचं संकट ओसरल्याने मंत्रिमंडळात फेरबदल करून पुन्हा नव्या दमाने राज्याच्या
जनतेसमोर जाण्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातं. याच बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलाची तारीख निश्चित करण्याबाबत आणि महामंडळांच्या नियुक्त्यांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दरम्यान, ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केल्यानंतरही राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याकडून भाजप नेत्यांवर काहीच कारवाई करण्यात येत नाही.
त्यामुळे शिवसेनेत खदखद आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडे असलेलं गृहखातं शिवसेनेने घ्यावं, अशी शिवसेनेतूनच मागणी होत आहे. शिवसेनेकडील वन खाते राष्ट्रवादीला देऊन गृहखाते
घेण्याची मागणी होत आहे. तसेच काँग्रेसला राष्ट्रवादीकडील अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय खातं हवं आहे. यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.