माय महाराष्ट्र न्यूज:ऊसाला तोड मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतकर्याने ऊस पेटवून देत विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक
घटना जोहरापूर ता. शेवगाव येथे घडली. जनार्धन सिताराम माने (वय 70) असे या दुर्देवी शेतकर्याचे नाव आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, जोहरापूर येथील शेतकरी जनार्धन माने
यांचा पावणेतीन एकर ऊस खामगाव शिवारात गट नंबर 9 मध्ये आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे माने यांचा ऊस बाधीत झाला होता. त्यामुळे सरकारचा निर्णयानुसार पूर क्षेत्रातील
ऊसाला प्राधान्याने तोड मिळणे आवश्यक होते. मात्र ऊसतोडणीचा हंगाम संपत आला असल्याने ऊसाला तोड मिळण्यासाठी त्यांनी साखर कारखान्याकडे चकरा मारायला सुरुवात केली.
मात्र तरी देखील तोड मिळत नसल्याने हतबल झालेल्या माने यांनी काल मंगळवार दि. 5 रोजी दुपारी 2 च्या सुमारास ऊस पेटवून देत शेतात विषारी औषध प्राषण केले. त्यांना तातडीने शेवगाव येथील नित्यसेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र उपचारा दरम्यान त्यांचे आज बुधवार दि. 6 रोजी निधन झाले.. पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पो. काँ. रामेश्वर घुगे हे करीत आहेत.