नगर : एसटी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात महाविकास आघाडीच्या सरकारला अपयश आले आहे. एसटी कामगारांबराेबर संवाद साधण्यात राज्य सरकार कमी पडले. त्यातून कामगारांचा उद्रेक सुरू हाेऊन ताे रस्त्यावर आला आहे.
*कामगारांचा उद्रेक*
आंदोलनाचा हा मार्ग नाही. संपकरी कामगारांना सतत कायदेशीर कारवाईचा धाक दाखवला गेला. त्यामुळे कामगारांचा उद्रेक झाल्याचा आराेप भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला.
संपकरी एसटी कामगारांनी काल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थावर हल्लाेबाेल केला. चप्पल फेकाफेकीबराेबर दगडफेक झाल्याचेही सांगितले गेले. संपकरी एसटी
कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पाेलिसांनी अटक केली आहे. या घटनेचे राज्यात पडसाद उमटले असून, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
*विखे म्हणाले,*
एसटी कामगारांचा पाच महिन्यांपासून संप सुरू असून १२५ कामगारांचे बळी गेले आहेत. तरीही सरकार शांत बसून होते. केवळ त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाचे कारण पुढे करुन सरकार वेळ मारून नेली.
सरकारने कामगारांना विश्वासात घेवून त्यांच्याशी संवाद सुरू ठेवायला हवा होता. परंतु सरकारमधील प्रत्येक मंत्री फक्त कायदेशीर कारवाई करण्याचा धाक दाखवून कामगारांवर दडपशाही करीत असल्यामुळेच सरकारच्या विरोधातील रोष आता रस्त्यावर आला आहे.