माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील अनेक ठिकाणी मद्याची दुकाने, बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची तसेच गडकिल्ल्यांची नावे दिल्याचे आढळून येते. मात्र राज्यात यापुढे मद्यविक्री दुकाने आणि बार यांना देवदेवतांची,
राष्ट्रपुरुषांची, महनीय व्यक्तींची तसेच गड किल्ल्यांची नावे देण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. सध्या अस्तित्त्वात असलेली नावे बदलण्याकरता ३० जूनपर्यंत मद्यविक्री आस्थापने व बार
यांना मुदत देण्यात आली आहे.यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने दिलेल्या एका आदेशात म्हटलंय, राज्यातील गडकिल्ल्यांविषयी तसेच राष्ट्रपुरुषांविषयी प्रत्येकाच्या मनात आस्था आहे.
त्यामुळे देवदेवता, राष्ट्रपुरुष आणि गडकिल्ले यांच्या नावाचा वापर केल्यास देवदेवता, राष्ट्रपुरुष व गडकिल्ल्यांची विटंबना होते. याशिवाय धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या जातात.
यामुळे सामाजिक वातावरणही दूषित होते. त्यामुळे राज्यातील मद्य विक्री दुकाने व बार यांना कोणकोणत्या राष्ट्रपुरुषांची व गडकिल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असंही या आदेशात सांगितलं आहे.
यासंदर्भात गृह विभागाने एक यादी जाहीर केली आहे. त्यात 56 राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा आणि राज्यातील 105 गडकिल्ल्यांच्या नावांचा समावेश आहे.
सध्या मद्यविक्री दुकाने व बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची व गडकिल्ल्यांची नावे असतील तर ती 30 जूनपर्यंत बदलावीत, अशा सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.