माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जाहीर केल्याप्रमाणे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्यासंबंधीचे दावे दाखल करण्यासाठी
सर्वोच्च न्यायालयाने कालमर्यादा निश्चित केल्याची माहिती सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.न्यायालयाच्या आदेशानूसार २० मार्च २०२२ पूर्वी कोरोना मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान
भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी २४ मार्च २०२२ पासून पुढील ६० दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर, आगामी काळात कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्या तारखेपासून ९० दिवसांच्या
कालावधीत नुकसान भरपाईचा दावा करता येईल. संबंधितांकडून नुकसान भरपाईचा दावा केलेल्या तारखेपासून त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे कार्य तीस दिवसांमध्ये होवून प्रत्यक्ष नुकसान भरपाईची
रक्कम देण्यासंबंधी यापूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल,असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.अतिशय अवघड परिस्थिती, अडचणीच्या काळामुळे विहीत काळामध्ये नुकसान
भरपाईचा दावा दाखल करू न शकणाऱ्यांना तक्रार निवारण समितीकडे जाता येईल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. समितीमार्फत प्रत्येक प्रकरणाच्या कारणांचा विचार केल्यानंतर अर्ज विचारात घेतला जाईल.
याशिवाय, बनावट दाव्यांची जोखीम कमी करण्यासाठी दाव्यांपैकी ५% अर्जांची आगंतुक छाननी पहिल्याच टप्प्यात करण्यात यावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. खोटा दावे
करणाऱ्यांवर डीएम कायदा,२००५ कलम ५२ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.