मुंबई
राज्य शासनाच्या संकल्पन, प्रशिक्षण,जलविज्ञान, संशोधन व सुरक्षितता,महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (मेरी-मेटा) महासंचालक डॉ. संजय मधुकर बेलसरे यांची जलसंपदा विभागाचे सचिव (लाक्षेवि) पदी नियुक्ति करण्यात आली आहे.
जलसंपदा विभागाचे सचिव (लाक्षेवि) श्री. राजनकुमार र. शहा, हे नियत वयोमानानुसार शासन सेवेतून दि.३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जलसंपदा विभाग सचिव(लाक्षेवि) या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय कारणास्तव संकल्पन, प्रशिक्षण,जलविज्ञान, संशोधन व सुरक्षितता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालक
डॉ.संजय बेलसरे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आला होता.
अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी ६ जून रोजी आदेश काढून
डॉ. संजय बेलसरे यांची जलसंपदा विभागाचे सचिव (लाक्षेवि) पदी पूर्णवेळ नियुक्ति केली आहे.
आपल्या आदेशात अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे म्हणाले की,शासनाने डॉ. बेलसरे यांची नियुक्ती सचिव (लाक्षेवि ), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर श्री. राजन शहा यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागी केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या महासंचालक (संकल्पन, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व सुरक्षितता), महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक या पदाचा कार्यभार अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून सचिव (लाक्षेवि ) जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई या पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा असे आदेशीत केले आहे.
डॉ.बेलसरे यांनी यापूर्वी जलसंपदाच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता म्हणूनही दर्जेदार काम केले.छ. संभाजीनगर येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहिलेला आहे.पाणी वापर संस्थांची चळवळ राज्यभर पोचवण्यात डॉ. बेलसरे यांचा सहभाग राहिला आहे.
सचिव व सचिव समकक्ष दर्जाचे कार्यकारी संचालक, महासंचालक संवर्गामध्ये त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. जलसंपदा विभागात कार्यरत असणारे कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.