गंगापूर | दत्तात्रय जोशी:पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत सामान्य, गरजू लोकांना घरकुलाचा लाभ देण्याऐवजी आपल्याच दैनंदिन संबंधातील लोकांचा, धनदांडग्यांचा समावेश लाभार्थींच्या यादीत करण्याचा ‘करिष्मा’ सोलेगांव
ग्रामपंचायतीने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘कोई नहीं देखता, भर अब्दुल्ला गुड थैली मे’ सारखा हा प्रकार काही जागरूक ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ओरड करीत अपात्रांना पात्र
करण्यासाठीचे लावलेले निकष जाहीर करण्याची मागणी सुरु केल्याने मर्जीतील लोकांसह धनदांडग्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीत घेणाऱ्यांची भंबेरी उडाली असून, त्यांना पळता भुई थोडी झाल्याचे चित्र सोलेगांवमध्ये दिसत आहे.
गंगापूर तालुक्यातील सोलेगांव ग्रामपंचायतीने घरकुल यादीत समाविष्ट मंजूर लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन मासिक ग्रामसभेत नुकतेच केले. परंतु, शासनाचे नियम व कॅटेगिरी आणि क्रमवारीनुसार अहवाल सादर करण्याऐवजी पात्र ‘ड’ यादीतील लाभार्थ्यांपैकी
१२१ लाभार्थ्यांना अंतिम मंजूर यादीत स्थान दिल्याचे उघडकीस आले. शिवाय याच लाभार्थ्यांमध्ये काही मर्जीतील लोकांच्या कुटुंबातील नावे पंचायत समिती कार्यालयाकडे पाठविल्याचीही माहिती पुढे आली.
उघड्यावर राहून घरकुलाचे प्रतीक्षा करणाऱ्यांऐवजी पक्की घरे असणाऱ्या अनेकांना पात्र लाभार्थ्यांच्या यादीत स्थान मिळाले असून, हे करताना प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत अटी- शर्ती व निकष डावलण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
चुकीच्या आणि अपात्र लोकांचा पात्र लाभार्थ्यांच्या यादीत समावेश केल्याने गावातील असंख्य दुर्बल घटकातील कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित राहिले आहेत. शिवाय शासनाच्या घरकुल योजनेला या प्रकारामुळे खिळ बसली आहे, असाही आरोप होत आहे.
यामध्ये कागदोपत्री जुळवाजुळवी करून पात्र नसलेल्या लोकांना घरकुल मंजूर करण्यात आले असून, अपात्र कुटुंबातील लोकांची नावे मंजूर यादीत समाविष्ट करण्यात आल्याचाही आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. आता सदर प्रकरणाची योग्य ती
चौकशी करून शासकीय योजनेत अफरातफर करणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे. एवढेच नव्हे तर सदरील गैरप्रकाराची चौकशी करून मंजूर यादीतील लाभार्थ्यांची
कोणत्या निकषानुसार पात्रता यादीत निवड करण्यात आली, याबाबत अहवाल सादर करावा आणि अपात्र लाभार्थ्यांचे यादीत समावेश न करण्याबाबतचे जाहीर प्रगटन फलक ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करावे, अशी मागणी अकुंश लक्ष्मण पवार, सचिन अंकुश गोरे, ईश्वरदास कचरु उमाप, योगेश अंकुश गोरे,
दत्तात्रय अंबादास जोशी, संगिता शेषराव गोरे, दत्तात्रय परसराम हरार, राहुल भाऊलाल गोरे, बंडु गणपत गोरे, विष्णु पवार, नारायण चंद्रभाण गोरे, चांगदेव आसाराम उदे, संजय दशरथ गोरे, कैलास लक्ष्मण पवार,आदीसह तेव्विस ग्रामस्थांनी केली आहे.
आरक्षण बदलून काहींना मंजूर यादीत स्थान
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबधित मंजूर लाभार्थ्यांच्या यादीबाबत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गातील काही मर्जीतील लोकांचा समावेश अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती अशा इतर प्रवर्गामध्ये करून त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झाला आहे.