नेवासा/सुखदेव फुलारी
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक पदावर पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली
समिती गठित केली आहे.
महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांची संख्या 107 असून बहुराज्यीय सहकारी साखर कारखान्यांची संख्या 11 इतकी आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची जबाबदारी महत्वाची आहे. यापूर्वी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांवर कार्यकारी संचालक पदी काम करण्यासाठी सन 2005 मध्ये 66 आणि सन 2015 मध्ये 100 कार्यकारी संचालकांचे पॅनेल तयार करण्यात आले होते. त्यापैकी सद्य:स्थितीत एकूण 69 कार्यकारी संचालक विविध सहकारी साखर कारखान्यांवर कार्यरत आहेत.
साखर कारखानदारी बदलत असून मोठ्या प्रमाणावर ईथेनॉल, बायोगॅस, फार्मासेक्टर विकसित होत आहे. त्यामुळे नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काही बदलांसह राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनेल करणेबाबत प्रस्तावित होते. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची पुढील 5 वर्षांसाठीची गरज विचारात घेऊन अतिरिक्त 50 कार्यकारी संचालकांचे पॅनेल बनविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होती.
त्या अनुषंगाने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक पदावर पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी खालीलप्रमाणे समिती गठित केली आहे.
1) अध्यक्ष- साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे
2) सदस्य- महासंचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
3) सदस्य- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
4) सदस्य सचिव-सहसंचालक (प्रशासन), साखर आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
5)विशेष निमंत्रित- या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती (जास्तीत जास्त दोन )
उपरोक्त गठित समितीमार्फत नवीन पॅनेलसाठी 50 कार्यकारी संचालकांची निवड करण्यात येईल. समितीद्वारे निवड करण्यात आलेल्या कार्यकारी संचालकांची नियुक्ती प्रथमतः कनिष्ठ वेतनश्रेणीत करण्यात येईल.
साखर आयुक्त कार्यालयाने यापूर्वी जाहिर केलेल्या सन 2005 च्या पॅनेलमधील 66 कार्यकारी संचालकांचा आणि सन 2015 च्या पॅनेलमधील 100 कार्यकारी संचालकांचा तसेच या शासन निर्णयानुसार निवड होणाऱ्या 50 कार्यकारी संचालकांचा समावेश कार्यकारी संचालकांच्या नवीन पॅनेलमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांनी या पॅनेलमधील कार्यकारी संचालकाची नेमणूक करणे बंधनकारक राहील.सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकाच्या पदावर निवड होण्यासाठीची परिक्षा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यात येईल.
*कार्यकारी संचालक, सहकारी साखर कारखाना या पदावर नियुक्तीसाठी वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, आणि नियुक्तीच्या कार्यपद्धतीबाबतची नियमावली अशी…*
1) उमेदवाराची वयोमर्यादा:– उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आणि 50 वर्षापेक्षा अधिक नसावे.
2) उमेदवाराची शैक्षणिक पात्रता:-– (1) कृषी शाखेचा पदव्युत्तर पदवीधर (Post Graduate), (2) वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर पदवीधर (M. Com), (3) B.E. (मेकॅनिकल / केमिकल / इलेक्ट्रिकल),
(4) M.Sc. (Wine brewing and Alchohol Technology),
(5) Chartered Accountant, (6) ICWA,(7) Company Secretary
(8) MBA (Finance)/ MBA (HR),(9) विभागप्रमुख / खातेप्रमुख म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. आज रोजी साखर कारखान्यांत किमान ५ वर्षे कार्यरत असणाऱ्या उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) व साखर कारखान्याच्या लेटरहेडवर संबंधित कारखान्याच्या कार्यकारी संचालक व प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचे प्रमाणिकरण आवश्यक आहे.
(10) मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक.
3) वेतनश्रेणी:– कार्यकारी संचालकांच्या पॅनेलवर नव्याने नियुक्त होणाऱ्या कार्यकारी संचालकांना नियुक्तीच्या वेळी कनिष्ठ वेतनश्रेणी रु. 15600-39000 ग्रेड पे रु. 5,400/- लागू असेल.
4) परिक्षेचे स्वरूप:–पहिला टप्पा वस्तूनिष्ठ बहुपर्यायी चाळणी परीक्षा.
(100 प्रश्न प्रत्येकी 2 गुण),दुसरा टप्पा लेखी परीक्षा तिसरा टप्पा:-25 गुणांची मौखिक / तोंडी परीक्षा(5 मुख्य प्रश्न प्रत्येकी 15 गुण)
(i) पहिल्या टप्प्यातील वस्तूनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा (Objective) ही चाळणी स्वरूपाची असेल. या परिक्षेत ज्या उमेदवारांना किमान 70 गुणांपेक्षा जास्त गुण मिळतील असे सर्व उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षेस पात्र
राहतील. (ii) पहिल्या टप्प्यातील पात्र उमेदवार लेखी परिक्षेला पात्र असतील. लेखी परीक्षेतील उमेदवारांची गुणानुक्रमे तयार करण्यात येईल. त्यापैकी सर्वोच्च गुणधारक उमेदवार 1:3 पद्धतीने तोंडी परिक्षेस पात्र असतील.
(iii) लेखी परीक्षा व तोंडी परीक्षेतील गुणांची बेरीज करून उमेदवारांची 100 मार्काची अंतिम गुणपत्रिका बनविली जाईल. त्यातील गुणानुक्रमाने जास्तीत जास्त पहिल्या 50 उमेदवारांना कार्यकारी संचालकांचे पॅनेलवर समाविष्ट केले जाईल.
5) कार्यकारी संचालकांचे नविन पॅनेल तयार करताना राबवावयाची कार्यपद्धती:–कार्यकारी संचालकांची निवड प्रक्रिया वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटीव्ह मॅनेजमेंट, पुणे / एम. के. सी. एल. या अथवा इतर सक्षम बाह्य यंत्रणेकडून करणेत येईल. त्यासाठी आवश्यक अटी व नियम, शैक्षणिक पात्रता इ. बाबींसह प्रस्ताव निवड केलेल्या संस्थेस देता येईल.
6) कार्यकारी संचालकांच्या पॅनेलचा कालावधी:–सन 2005 मध्ये व सन 2015 मध्ये बनवलेल्या पॅनेलमधील कार्यरत व पात्र कार्यकारी संचालकांची यादी पूर्वीची असून त्या यादीमध्ये या 50 नवीन कार्यकारी संचालकांची समाविष्ट कार्यकारी संचालकांची एक अंतिम यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यात यावी. यापुढे कार्यकारी संचालकांचे पॅनेल म्हणून याच यादीतील कार्यकारी संचालक काम करतील. या पॅनेलला कोणतीही मुदत असणार नाही.