माय महाराष्ट्र न्यूज:कधी ग्राहकांच्या, तर कधी उत्पादन घेणाऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी आणणारा कांदा सध्या कमी भाव असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी काढत असल्याचे चित्र आहे.
मात्र, आता कांदा उत्पादकांना दिलासा देणारी गोष्ट झाली आहे. नाफेडच्या माध्यमातून आता कांदा खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आता काही प्रमाणात कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.
कांद्याचे विक्रमी उत्पादन अपेक्षित असताना घसरलेले कांद्याचे दर सावरण्यासाठी ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्यामुळे 19 एप्रिलपासून महाराष्ट्रात ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात यावर्षी कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. विक्रमी उत्पादनही अपेक्षित आहे. कांद्याचे दर कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मूल्य स्थिरीकरण निधी अंतर्गत, किमान 15 रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
त्यांच्या या मागणीची दखल घेत शासनाने 2 लाख 20 हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 1 लाख 70 हजार कांदा खरेदी करण्यात आला होता. त्या तुलनेत 50 हजार टन कांदा
जास्त खरेदी करण्यात येणार आहे. सध्या प्रचलित बाजारभावाप्रमाणेच कांदा खरेदी करण्याचा निर्णय ‘नाफेड’ने घेतला आहे. कांदा खरेदीचा निर्णय झाल्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे.