Saturday, September 23, 2023

शिर्डीची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी आग्रही-राजेंद्र नागवडे

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसताना शिर्डी लोकसभा मतदार संघातून गेल्या सलग दोन वेळा शिवसेनेचा खासदार निवडून येतो, ही बाब अंतर्मुख करणारी असून आगामी निवडणूकीत ही जागा काँग्रेसलाच मिळण्यासाठी आग्रह धरणार असून येथून काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन जिल्ह्याध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले. श्री.नागवडे यांच्या या आवाहनामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस आग्रही भुमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष नागवडे यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका घेऊन जनसंवाद यात्रेचे नियोजन सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक नेवासा फाट्यावरील वाघमारे कॉम्प्लेक्समध्ये नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेस ओबीसी सेलच्या राष्ट्रीय समन्वयक मंगलताई भुजबळ, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, प्रदेश सचिव बंटी यादव, जिल्हा कार्यकारीणी सदस्य दिपक कदम, सुदाम कदम, निर्मलाताई ढगे, तसेच चंद्रशेखर कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांसमोर बोलताना नागवडे यांनी, देशासाठी योगदान व बलीदान देणाऱ्या नेत्यांचा पक्ष म्हणून काँग्रेसची सर्वसामान्यांत ओळख असल्याचे स्पष्ट करुन जनसामान्यांचे प्रश्न घेऊन लढा उभारण्याचे काम कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन केले. जनसंवाद यात्रेची रुपरेषा स्पष्ट करुन भाजप सरकारच्या कारभाराला लोक कंटाळले असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यात फडणवीस-शिंदे तर केंद्रात मोदी-शहा एवढेच लोक राज्यकारभार हाकत असल्याकडे नागवडे यांनी यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून सामान्य लोकांशी निगडीत महागाई, बेरोजगारी सारख्या विषयांवर मात्र हे राज्यकर्ते बोलण्याचे सोयिस्करपणे टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याऐवजी विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करुन जाती-धर्माच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे राजकारण सुरु असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी श्रीमती मंगल भुजबळ, अॅड कल्याण पिसाळ, चंद्रशेखर कडू, बंटी यादव, ज्ञानदेव वाफारे यांची समयोचित भाषणे झाली.

नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी प्रास्ताविक व स्वागत
केले. यावेळी माळवदे यांनी तालुक्यात काँग्रेस पक्षाचे मजबूत संगठन उभारून पक्ष मजबूत करण्यावर भर दिला जाईल तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते पुर्ण ताकदीने उतरुन पक्षाला यश मिळवून देतील.संगठन मजबूत करण्यासाठी लवकरच तालुक्यात काँग्रेस संवाद यात्रा काढण्यात येईल असे स्पष्ट केले.

याप्रसंगी एड. कल्याणराव पिसाळ चंद्रशेखर कडू, अण्णासाहेब पटारे, किशोर भणगे, संदीप मोटे, शोभाताई पातारे, अंजुम पटेल, सुनील खरात, रंजन जाधव, सचिन बोर्डे, सतिष तऱ्हाळ, किरण साठे, शाम मोरे, संजय होडगर, इलियास शेख, आलम पिंजारी,गोरक्षनाथ काळे, सुदाम कदम, गणेश चौगुले,निर्मला ढगे, ज्योती भोसले, राणी भोसले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*काँग्रेसमध्येच कुवत*

देशात सध्या विषारी राजकारण सुरु असून विविध समाजांत वाद निर्माण करुन ‘फोडा आणि राज्य करा’ या इंग्रज नितीप्रमाणे काम सुरु असल्याचा आरोप काँग्रेस ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक मंगलताई भुजबळ यांनी यावेळी केला. देशाला प्रेम, बंधुभावाने जोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन त्यांनी करुन देश सुरक्षित ठेवण्याची कुवत फक्त काँग्रेस पक्षातच असल्याचा ठाम दावा केला.

*चांगल्या दिवसांची चाहूल*

डोक्यात काय आहे याला किंमत नसून डोकी किती आहेत याला राजकारणात महत्व असल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यापुढील काळात प्रेझेंटेशनला महत्व देण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी यावेळी केले. कर्नाटक विधानसभेचा निकाल ही चांगल्या दिवसांची चाहूल असल्याने कार्यकर्त्यांनी त्यासाठी नियोजनपूर्वक कामाला लागण्याचे आवाहन वाफारे यांनी यावेळी केले.

*वाडा आणि राजवाडा*

गेल्या दोन निवडणूकांत एकही आमदार नसताना शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार निवडून येत असल्याच्या जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या वक्तव्याचा संदर्भ पकडून अनुसुचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी निवडणूकीतील सामाजिक समिकरणे चुकल्यामुळे हे घडत असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले. ‘वाडा आणि राजवाडा’ प्रामाणिकपणे एकत्र आल्यास या मतदारसंघातून काँग्रेसचाच उमेदवार विजयी होणार असल्याचे सूचक विधान वाघमारे यांनी यावेळी केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!