माय महाराष्ट्र न्यूज:नगर-मनमाड महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू असताना अपघातांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. कोल्हार ते राहुरी फॅक्टरी रस्त्यावर झालेल्या अपघातात मागील
तीन महिन्यात ९ जण ठार झाले आहेत. गुहा येथे गुरुवारी रात्री ऊसतोडणी कामगारांना घेऊन जात असलेला ट्रेलर उलटला होता. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रात्री ११ वाजता भेट देऊन रस्त्याची
कामाची पाहणी केली. ठेकेदाराला कामात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.चार महिन्यांपासून गुहा ते राहुरी दरम्यान रस्ता डांबरीकरण व सहापदरी विस्तारिकरणाचे काम सुरू आहे.
मात्र, हे काम करताना कुठेही कामासंदर्भात प्रवासी वाहनचालक सुरक्षितता या दृष्टीने फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सातत्याने अपघात झालेले आहेत. आजपर्यंत या परिसरात झालेल्या अपघातात
नऊ प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. सुरक्षाविषयक माहिती फलक असते, तर प्रवाशांचे प्राण वाचू शकले असते. कामाच्या ठिकाणी दिशादर्शक कामाच्या फलकाची माहिती देणारे विशेषतः रात्रीही दिसू शकतील
अशा रिफ्लेक्टरमध्ये फलक लावले नाहीत. सुरक्षारक्षक नियमांचे रस्ता ठेकेदाराने पालन न केल्याने हे अपघात झाले आहेत, असा आरोप गुहा येथील नागरिकांनी करून मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.
गुरुवारी रात्री ऊस तोडणी कामगार घेऊन जात असलेला ट्रेलर पलटी झाला. याचवेळी मंत्री तनपुरे यांनी या ठिकाणी थांबून रस्त्याच्या कामाची पाहणी केली. रस्त्याच्या कामाच्या ठिकाणच्या त्रुटी काढून ठेकेदाराला
योग्य त्या सूचना करणार असल्याचे सांगितले. यावेळी अपघातात जखमींना युवा उद्योजक सुजित वाबळे यांच्या मदतीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. अन्य ऊसतोडणी कामगारांच्या जेवणाची
व्यवस्था सुजित वाबळे यांनी केली. यावेळी सुजित वाबळे, शरद वाबळे, विलास वरपे, सुरेश वरपे, डॉ. विजय वाबळे, दिलीप बोरुडे, दत्तू वरपे, रंगनाथ ओहोळ, बाबाजी काकडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकशी करून कारवाई करू या रस्त्याचे काम घेतलेल्या संबंधित कंपनीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज आला आहे. त्याबाबत चौकशी
करूनच नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.