शिर्डी, दि.९ जून
परिवहन विभागाने रस्ता सुरक्षेच्या राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे राज्यातील महामार्गावरील अपघाती मृत्युमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षाच्या पाच महिन्यातच ७५० ने कमी झाले आहे. समृध्दी महामार्गावर १० एप्रिल पासून आतापर्यंत १५ हजार वाहनांच्या टायरची तपासणी करण्यात येवून ७५० वाहनांना खराब टायर अभावी समृध्दीवर प्रवेश नाकारण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवर यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सिएट लिमिटेड या टायर उत्पादक कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या टायर तपासणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी इंटरजेंचवरील टोलनाक्यावर टायर तपासणी केंद्राचे श्री.भिमनवर यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रस्ता सुरक्षा कक्षाचे उप परिवहन आयुक्त भरत कळसकर, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, औरंगाबादचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, सहाय्यक परिवहन अधिकारी मनिष दौंड, सिएट लिमिटेडचे सुनिल झा, श्रीनिवास पत्की, अलियान वाझ, सुमेद्य वैद्य आदी यावेळी उपस्थित होते.
श्री.भिमनवर म्हणाले, वेग मर्यादचे उल्लंघन, फार काळ विश्रांती न घेता गाडी चालवली तर रस्ता संमोहन होऊन अपघात व वाहन सुस्थितीत नसणे या तीन कारणामुळे समृध्दी महामार्गावर अपघात होत आहेत. वेग मर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांचे समुपदेशन करण्यासाठी परिवहन विभागाने समृध्दी महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. आतापर्यंत तीन हजाराहून अधिक वाहनधारकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
या टायर तपासणी केंद्रावर सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहनधारकांना नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पिन चेक व रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरूस्ती, टायर वेअर चेक यंत्राचे वितरण या सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. या सुविधेचा जास्तीत वाहनधारकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन अहमदनगर उप प्रादेशिक परिवन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.