माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना मोठा झटका बसला आहे. सर्वसामान्य, कष्टकरींची
विधानसभेत बाजू मांडणारे लोकप्रतिनिधी म्हणून बच्चू कडू यांची ख्याती आहे. पण याच बच्चू कडूंविरोधात तपास करुन गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने दिले आहेत.
त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्यातील तीन रस्त्यांमध्ये 1 कोटी 95 लाखांच्या
आर्थिक अनियमितता केल्याला आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. याच आरोपांप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आदेश दिला आहे.वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी जानेवारी
महिन्यात अकोला पोलिसांकडे तक्रार केली होती. पण पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.
तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही तक्रार केली होती. राज्यपालांनी तक्रार ऐकून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी न्यायालयात पुरावे सादर केले होते.
त्यानंतर आता अकोला जिल्हा न्यायालयाने 24 तासांच्या आत तपास करुन गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.आता महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणावर बच्चू कडू नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.