नेवासा/प्रतिनिधी
नेवासा पोलिसांनी तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात धडक कारवाईची मोहीम उघडून केलेल्या कारवाईंनंतर नेवासा तालुका शिवसेनेने (शिंदे गट) आपले आंदोलन स्थगित केले. तसे पत्र त्यांनी पोलीस प्रशासनास दिले.
यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना अवैध धंद्यांविरोधात केलेल्या कारवाईंची लेखी माहिती पत्र दिले. श्री. डोईफोडे यांनी नेवासे पोलीस ठाण्याचे सूत्रे हाती घेतल्यापासून सर्वप्रथम त्यांनी वाळू तस्करी विरोधात धडक मोहीम उघडून कारवायांचा धडाका लावलेला आहे. दरम्यान काळात तालुक्यात अवैध दारू, मटका आदी धंदे काही प्रमाणात चोरट्यापद्धतीने चालू असल्याने हे अवैध धंद्याविरोधात कारवाई करून ते बंद करावे अशी मागणी शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख संजय पवार व महिला आघाडी प्रमुख मिराताई गुंजाळ यांनी नेवासे पोलीस प्रशासनास करून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा पोलिसांनी पोलीस ठण्याच्या हद्दीत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध देशी दारू, जुगार अशा एकूण १६ ठिकाणी धाडी टाकून रोख रकमेसह सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधित व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले. नेवासा पोलिसांनी अवैध धंद्यावर केलेल्या कारवाईमुळे शिवसेनेने पवार व गुंजाळ यांनी शिवसैनिकांसह पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षकांना आंदोलन स्थगित करत असल्याचे पत्र दिले.
*कडक कारवाई करणार..
“वाळू तस्करी व अवैध धंद्यांविरोधात नेवासा पोलिसांची कारवाई सुरू असून यापुढेही ती आणखी तीव्र करण्यात येईल. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येईल.
-शिवाजीराव डोईफोडे, पोलीस निरीक्षक