Saturday, September 23, 2023

पक्ष व श्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू-राजेंद्र वाघमारे

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

शिर्डी लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी करण्याचा प्रत्येक तालुक्यातून प्रचंड आग्रह होत आहे. सहकार्याचे बरेच हात पुढे आल्याने मनोबल उंचावले असून पक्ष व श्रेष्ठींनी विश्वास टाकल्यास तो सार्थ ठरवणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी केले.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भुमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत वाघमारे बोलत होते. स्वतःची राजकीय पार्श्वभूमी विषद करताना वाघमारे म्हणाले की, 1978 पासून काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता असून तालुक्यात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदिर्घकाळ काम केले. राजकीय जीवनात सर्वसमावेषक काम करण्याच्या कार्यपद्धतीमुळे तत्कालीन पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यामुळे जिल्हा परिषदेत निवडून जात समाजकल्याण विभागाचा सभापती म्हणून उठावदार काम करता आले. शेती, व्यवसायात लक्ष घातल्यामुळे मधल्या काळात सत्तेच्या राजकारणापासून दूर असलो तरी पक्ष कार्यात मागे पडलो नाही. त्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी अनुसुचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठे संघटन उभारले असून विविध जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे जिल्हाभरात दांडगा जनसंपर्क तयार झाला आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणूकांत जिल्ह्यात एकही आमदार नसताना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार निवडून येत असल्याची खदखद सर्वांनाच होती. परंतु सामाजिक समिकरणे चुकत असल्याने काँग्रेसला या मतदारसंघात स्वतःची ताकद असतानाही पराभव पत्करावा लागत असल्याची बाब पक्षनेतृत्वाच्या निदर्शनास आली आहे. त्यादृष्टीकोनातून त्यांची नवीन उमेदवाराची चाचपणी सुरु असतानाच जिल्हाभरातून आपणच योग्य उमेदवार म्हणून पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी प्रथम पसंती दिलेली आहे. आपल्याला उमेदवारी मिळाल्यास या मतदारसंघातून काँग्रेस परत एकदा दिमाखात उभी राहण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पक्ष व श्रेष्ठींनी विश्वास टाकल्यास तो सार्थ ठरविण्यास कुठलीही कमतरता ठेवणार नसल्याचे वाघमारे यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.

शिर्डी मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत विकास कामांच्या बाबतीत मोठा अनुशेष निर्माण झाला असून आपण निवडून आल्यानंतर तो भरुन काढण्याचे मोठे आव्हान स्विकारणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. या मतदारसंघात नवीन उद्योगधंदे वाढविण्याबरोबरच जुन्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या मतदारसंघात बेरोजगारीची मोठी समस्या असून ती कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वसामान्य लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण व सुरक्षितता या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून विशेष कृती कार्यक्रम आखून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्वतःची समांतर व्यवस्था उभी करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे, सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सचिव चंद्रशेखर कडू, परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप मोटे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभाताई पातारे, जिल्हा सरचिटणीस सुदाम कदम, नेवासा बाजार समितीचे संचालक अण्णासाहेब पटारे, अल्पसंख्यांक विभागाचे अंजुम पटेल, मुसा बागवान, भेंड्याचे सरपंच सुनील खरात, प्रा.अशोक ढगे, सचिन बोर्डे, सतिष तऱ्हाळ, मोहन भवाळ, किरण साठे, शाम मोरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!