माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या वेगवान घडामोडींनंतर प्रथमच जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी
सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. आंबराई विश्रामगृह येथे कडक पोलिस बंदोबस्तात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीचा जनता दरबार पार पडला.
मंत्रीपदाच्या अडीच वर्षांत मंत्री गडाख नेवासे तालुक्यात आल्यानंतर पोलिस बंदोबस्ताचा डामडौल ठेवत नव्हते. मात्र शुक्रवार (ता. 22) रोजी त्यांच्या स्वीय सहाय्यकावर झालेला गोळीबार
व दोन दिवसांने व्हायरल झालेली धमकीची ऑडिओ क्लीप यामुळे पोलिस यंत्रणेने सतर्क होवून बंदोबस्तात वाढ केली आहे.घटनेनंतर आठ दिवसाने मंत्री गडाख आंबराई विश्रामगृह येथे थांबले होते.
सकाळी साडेनऊ ते तीन वाजेपर्यंत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. या ठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तीन शस्रधारी व इतर आठ ते दहा कर्मचारी तैनात होते.
साध्या वेशातील काही पोलिस तेथील हालचालीवर लक्ष ठेवून होते.सध्या मंत्री गडाखांच्या नगर व सोनई येथील घराबाहेर शस्रधारी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तालुक्यात
फिरत असताना त्यांच्या मोटारीच्या मागे, पुढे पोलिस वाहन असणार आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक बागुल यांनी सांगितले.गोळीबार व ऑडिओ क्लीप वरील धमकी प्रकरणाचा
संपुर्ण तालुक्यातील निषेध होत असुन गाठीभेटीच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी गडाखांना पाठिंबा असल्याचे सांगितले.