माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल शनिवारी कांद्याच्या आवकेत 10 हजार गोण्यांनी वाढ झाली.
जास्तीत जास्त भाव 1200 रुपयांपर्यंत स्थिर होते.काल शनिवारी 30 हजार 713 गोण्या (16 हजार 469 क्विंटल) आवक झाली. एक-दोन लॉटला 1100 ते 1200
रुपयांपर्यंतचा भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 900 ते 1050 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 700 ते 900 रुपये, गोल्टा कांद्याला 400 ते 700 रुपये, गोल्टी
कांद्याला 100ते 400 रुपये तर जोड कांद्याला 200 ते 400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. हलका डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपये भाव मिळाला.
दरम्यान कांदा लागवडीचा दर यावर्षी एक हजार रुपयांनी वाढला. दहा हजार रुपये एकराचा दर अकरा हजार रुपये झाला. काही ठिकाणी तर बारा हजाराच्यावर गेला. जो दर लागवडीला तोच
दर काढणीला, असा नियम मजुरांनी केल्याने काढणीला देखील अकरा ते बारा हजार रुपये एकराने पैसे द्यावे लागले. सर्वत्र काढणीची झुंबड उडाल्याने मजुरांचा तुटवडा झाल्याने बाहेरगावावरुन
मजूर आणावे लागले. त्याचा वाहतूक खर्च अंगावर पडला. इंधन दरवाढ झाल्याने नांगरणीपासून वाहतुकीपर्यंत सर्वांचीच दरवाढ झाली. काढलेला कांदा टेलरमध्ये भरण्यासाठी सहाशे रुपये
टेलर दर झाला. तर वाहतुकीसाठी देखील सहाशे रुपये टेलर दर झाला. अंतर जास्त असेल तर दर आणखी जादा मोजावा लागला. साधारणपणे दहा ते बारा बायांंनी एका दिवसात एक एकर कांदा काढला.
त्यामुळे त्यांना दिवसाला हजार ते बाराशे रुपये रोजंदारी मिळाली. तर टेलरमध्ये कांदा भरणार्या मजुरांना देखील हीच रोजंदारी मिळाली. त्यामुळे मजुरांची चांदी झाली. कधी नव्हे ते यंदा अत्यंत
मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची व खतांची विक्री झाल्याने कृषीसेवावाल्यांची ही चांदी झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च होऊन देखील आज मजूर तुपाशी अन् शेतकरी उपाशी अशी बिकट अवस्था शेतकर्यांची झाली आहे.