माय महाराष्ट्र न्यूज: राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंतचे अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती. दरम्यान
पात्र शेतकऱ्यांची यादी 11 मे पर्यंत सहकार विभागाकडे देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. याचबरोबर या योजनेची स्पष्टता आलेली नाही. या योजनेची स्पष्टता आल्यानंतर
संगणकीय प्रणाली पूर्ण होऊन पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या सर्व बाबी पूर्ण होण्यास ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे.
महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेत नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची घोषणा करतानाच यंदाचे वर्ष महिला शेतकरी- शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून
साजरे करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती.अर्थसंकल्प सादर करताना पवार यांनी, कृषी क्षेत्र हाच विकासाचा पाया आहे, यावर सरकारचा विश्वास आहे. त्यामुळे या क्षेत्रातील
पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी 3 हजार कोटींची भरीव तरतूद केल्याचा दावा केला. तसेच हे वर्ष ‘‘महिला शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष’’ म्हणून राबविण्याची घोषणा करताना
पवार यांनी महिला शेतकऱ्यांकरीता कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्के तरतूद वाढवून 50 टक्के करण्यात येईल. तसेच कृषी विभागाच्या योजनांमध्ये यापुढे तरतुदीच्या 3 टक्के निधी आजी-माजी सैनिकांनाही
उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.कर्जमाफीच्या लाभासंदर्भात अभ्यास करण्यासाठी यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काही मंत्र्यांची
उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. नियमित कर्जदारांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देताना कोणत्या वर्षांतील आणि कोणत्या शेतकऱ्यांना तो लाभ द्यायचा, याचाही अभ्यास ही समिती करणार आहे.
कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत थकबाकीत नसलेल्या नियमित कर्जदारांनाच हा लाभ मिळू शकतो, असे बोलले जात आहे.