माय महाराष्ट्र न्यूज:नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून होणाऱ्या कामांचा श्रेयवाद चांगलाचा
पेटला आहे. तालुक्यात आमदारांकडून कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांवरही दबावतंत्र सुरू असल्याचा आरोप डॉ. विखे पाटील यांनी केला. ‘तालुक्यातील एकतरी अधिकारी हसताना दिसतो का? येथे
एक नाही तर दहा आमदार असावेत एवढे पीए आणि यंत्रणा कार्यरत आहे. त्या माध्यमातून हे दबाव तंत्र सुरू आहे. वेळ आल्यावर आपण त्यावर बोलू,’ असा इशाराही डॉ. विखे पाटील यांनी दिला.
खासदार डॉ. विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून शितपूर (ता. कर्जत) येथे सभामंडप उभारण्यात आला. त्याचे उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी डॉ. विखे पाटील बोलत होते.
अलीकडेच कर्जत जामखेडमध्ये सामाजिक न्याय विभाग आणि आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या कामांची उद्घाटने आमदार पवार यांच्या पुढाकारातून झाली आहेत. त्यासाठी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री
राजेश टोपे मतदारसंघात आले होते. मात्र ही कामे पूर्वीच्या सरकारच्या काळातील आणि काही केंद्र सरकारच्या निधीतून झाली आहेत. अशावेळी खासदाराला विश्वासात न घेता कार्यक्रम घेतल्याचा आरोप विखे पाटील यांनी पूर्वीच केला आहे.
तोच धागा पकडून त्यांनी आज पुन्हा टीका केली. डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कर्जतमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहाचे उद्घाटन झाले. या कामाची मंजुरी
माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली. निधी राम शिंदे यांनीच आणला मात्र नारळ फोडण्यासाठी भलतेच लोक गोळा झाले. येथील आमदार राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात.
मात्र, त्यांनी मंजूर करून आणलेल्या मिरजगावमधील रस्त्याची काय अवस्था आहे, हेही त्यांनी पहावे. राष्ट्रीय महामार्ग आमच्यावर सोडा, तुम्ही
आणलेल्या निधीतील रस्ता तरी पूर्ण करा,’ असा टोला विखे पाटील यांनी लगावला.