माय महाराष्ट्र न्यूज: जिल्हा परिषदेतील पद भरती यापुढे राज्यस्तरावरून करण्याऐवजी जिल्हा परिषदेच्या पातळीवर हाेणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड मंडळामार्फत ही कार्यवाही हाेईल.
ग्रामविकास विभागाने यासंदर्भातील सुधारित आदेश मंगळवारी काढलाय. त्यानुसार आरोग्य विभागाच्या ५ संवर्गातील पदभरती केली जाणार आहे. त्यासाठी मार्च २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांनाच संधी मिळेल.
राज्यातील हजारो उमेदवारांनी आरोग्य विभागाकडील पदांसाठी तीन वर्षापूर्वी, मार्च २०१९ मध्ये अर्ज केले होते. वेळोवेळी ही पदभरती अनेक कारणांनी पुढे ढकलली गेली होती. मार्च २०१९ मध्ये
ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांनाच परीक्षा देता येणार आहे. नव्याने अर्ज मागवले जाणार नाहीत किंवा जाहिरातही देता येणार नाही. गट-क संवर्गातील इतर पदांच्या सुधारित आकृतिबंधाचा
आढावा विभागीय आयुक्तांकडून घेतल्यानंतर जिल्हा परिषदेने तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवायचा आहे. या मंजुरीनंतर व वित्त विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेला कार्यवाही करता येणार आहे.
मार्च २०१९ मध्ये नगर जिल्हा परिषदेची ७२९ पदे भरायची होती. आरोग्य विभागाकडील पाच वर्गासाठी आता जिल्हा निवड मंडळामार्फत भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. यामध्ये ‘पेसा’
बाहेरील कार्यक्षेत्रातील औषध निर्माता १३, आरोग्य सेवक (पुरुष, हंगामी फवारणी उमेदवारांमधून) ११८, आरोग्य सेवक (सर्वसाधारण उमेदवारांमधून) ८२, आरोग्य सेविका (महिला) ३२९ व प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३,
तसेच पेसा कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवक (पुरुष, हंगामी फवारणी उमेदवारांमधून) १, आरोग्य सेवक पुरुष (सर्वसाधारण उमेदवारांमधून) ६ व आरोग्य सेविका (महिला) २३, अशा एकूण ५७५ भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.