माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत केलेल्या टीकेला पवार यांचे नातू व कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार
रोहित पवार यांनी प्रत्युत्तर देत हा महाराष्ट्र आहे, तुमच्या मनुवृत्तूची डाळ कदापिही शिजणार नाही, अशी थेट टीका केली आहे.रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून
भाजपवर निशाणा साधला आहे. यामध्ये रोहित पवार म्हणतात, अस्पृश्यतेच्या मनोवृत्तीला ठेचण्यासाठी संत ज्ञानोबा माउलींपासून संत तुकोबा, संत गाडगेबाबा,शाहू-फुले-आंबेडकरांपर्यंत
सर्वच महामानवांनी सामाजिक चळवळ उभी केली. अण्णाभाऊ साठे , नामदेव ढसाळ, जवाहर राठोड यासारख्या साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून अस्पृश्यतावादी मानसिकतेवर
आपल्या लेखणीतून घणाघात केला आणि समाजाला अन्यायाची जाण करून दिली.राजकीय आरोप करण्यासाठी भाजपने आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या संदर्भाची मोडतोड करून नास्तिकता
शोधली, परंतु त्याच संदर्भात अस्पृश्यतेवर केलेला घणाघात भाजपला दिसला नाही, हीच भाजपची खरी मानसिकता आहे.जवाहर राठोड यांच्या कवितेच्या संदर्भास नास्तिकतेचे नाव देऊन भाजपने
त्यांची खरी मानसिकता तर दाखवलीच आहे. शिवाय समाज सुधारणा चळवळीचा देखील अपमान केला आहे.मुळात देव आणि धर्म यांना भाजपा नेहमीच केवळ आणि केवळ राजकारणाच्या
चष्म्यातून बघत असल्याने खरा देव आणि खरा धर्म भाजपला कधी कळला नाही आणि कधी कळणारही नाही. त्यामुळेच पुरोगामी समाजसुधारकांना भाजपने आजवर नेहमीच पाण्यात पाहिले आहे.
सर्वच समाजसुधारकांच्या काळात देखील अशा मनुवृत्ती होत्या आणि त्या मनुवृत्तींनी नेहमीच या सर्व समाजसुधारकांचा विरोध केला. आज माऊली, तुकोबा, गाडगेबाबा हे महापुरुष असते
तर त्यांना देखील नास्तिक म्हणून भाजपने हिणवले असते, कारण हाच भाजपचा खरा विचार आणि चेहरा आहे.असो, हा महाराष्ट्र आहे.इथे तुमच्या मनुवृत्तीची डाळ कधीही शिजणार नाही, अशी
टीका करत त्यामुळे आता तरी सुधरा!, असा उपरोधिक सल्ला रोहित पवार यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून भाजपला दिला आहे.