माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून, राष्ट्रवादीच्या उन्मादी
कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे, असा आरोप प्रदेश
भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे उपस्थित होते.
अंतर्गत सत्तासंघर्षातून आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या
कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन चालविलेला धुडगूस आणि दहशतवाद तातडीने थांबवून कायद्याला त्याचे काम करू द्यावे, असा सल्लाही प्रा. राम शिंदे यांनी दिला.
२५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा या उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे वैफल्य आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्याला वेठीस धरत असतील, तर पवार यांनी त्यांना आवर घालावा असे आवाहनही त्यांनी केले.
*खा.विखेंचे मत वैयक्तिक, कार्यकारिणीत निर्णय*
जिल्हा परिषदे निवडणुकात समविचारी लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढवू असे मत खा.विखेंनी व्यक्त केले होते. यावर बोलताना शिंदे
यांनी पक्षात वैयक्तिक मतांपेक्षा पक्ष कार्यकारणी निर्णयावर धोरण असते. येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पक्ष पातळीवरच लढवल्या जातील असे सांगत खा.विखेंच्या
‘प्रयोगा’ला छेद दिला. तसेच विधान परिषदेत आमदारकी साठी पक्ष संघटन पाठीशी आहे आणि आपणही इच्छुक आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.