माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम
कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढण्याच्या घटना घडतात आणि त्याचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना बसतो. ग्राहकांच्या सुरक्षित आर्थिक व्यवहारासाठी आणि अशा
फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाचं निर्णायक पाऊल उचललं आहे.चला तर जाणून घेऊया एसबीआयच्या या नव्या नियमावलीबाबत. आता
यापुढे तुम्ही एटीएममधून पैसे काढणार असाल तर एसबीआयच्या या बदललेल्या नियमांचे पालन करावं लागणार आहे. ते नियम पाळले तरच तुमचे पैसे मिळतील अशी व्यवस्था
बँकेने केली आहे. अर्थात हा नियम 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढणार असाल तरच पाळावा लागणार आहे. झी न्यूजने याबाबत वृत्त प्रसिध्द केलं आहे. एटीएममधून
रक्कम काढण्यापूर्वी बँकेकडून ग्राहकांना एक ओटीपी पाठवला जाईल, जो त्यांच्या बँकेकडे नोंदणीकृत असलेल्या ग्राहकाच्या मोबाइल क्रमांकावर येईल.नव्या नियमानुसार ग्राहकांना त्या
ओटीपी क्रमांकाशिवाय एटीएममधून रोख रक्कम काढता येणार नाही. त्यामुळे एटीएममधून पैसे काढत असताना त्याचा नोंदणीकृत क्रमांक असलेला मोबाइल फोन ग्राहकासोबत
असणं आवश्यक आहे. बऱ्याचवेळा संबधित ग्राहकाने खात्यातून पैसे काढले नसताना रक्कम काढल्याचा मेसेज ग्राहकांना येतो आणि फसवणूक झाल्याचे ग्राहकाच्या लक्षात येते.
त्यानंतर ग्राहक बँकेत तक्रार करतात. मात्र आता ग्राहकांना हाच त्रास होऊ नये यासाठी एटीएममधून पैसे निघण्यापूर्वीच ग्राहकांच्या फोनवर ओटीपी क्रमांक पाठवला जाईल ज्यामुळे ग्राहकाच्या
अनुपस्थितीत एटीएम कार्डवरून गैरव्यवहार होत असेल तर ग्राहकाला त्याची माहितीही आधीच मिळू शकेल.एसबीआय बँकेचा हा नवीन नियम 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम
एटीएममधून काढणाऱ्या ग्राहकांसाठी बंधनकारक असणार आहे याची नोंद ग्राहकांनी घेणं आवश्यक आहे. तसेच प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी वेगळा ओटीपी क्रमांक दिला जाणार आहे.
चार अंकी असलेला हा ओटीपी क्रमांक बँकेच्या अधिकृत यंत्रणेकडून ग्राहकाच्या मोबाइल क्रमांकावर पाठवला जाणार आहे. एटीएममधून पैसे काढत असताना एटीएम मशीनच्या स्क्रिनवर
तो नंबर टाइप करणंही आवश्यक असणार आहे, अशी माहिती एसबीआयने दिली आहे.