माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. दोन महिन्यांपूर्वी जो कांदा ३५ रुपये किलोने विकला
जात होता, तो आज 50 पैसे आणि 1 रुपये किलोने विकला जात आहे. एवढ्या कमी दरात कांदा विकण्यापेक्षा फुकटात वाटप केलेला बरा असे म्हणत काही शेतकऱ्यांनी कांदा फुकट वाटला.
दरम्यान काही शेतकऱ्यांनी कांदा न काढताच आपल्याच रानात नांगरट फिरवत मुजवून टाकला आहे. खर्च दुप्पट आणि उत्पादन शून्य झाल्याची
शेतकऱ्यांनी व्यथा मांडली आहे. जळगाव जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची ही परिस्थिती झाली आहे.शेतमालाची बाजारपेठेत वाहतूक करण्यासाठी जेवढा खर्च केला जात आहे.
तेवढा भावही मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जळगाव जिल्ह्यातील विष्णू इंगळे यांनी आपल्या 4 एकर जमिनीत कांद्याची लागवड केली होती. कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी
आशा त्यांना होती. सध्या एक रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. हे पाहून त्यांनी शेतात ट्रॅक्टर फिरवत चार एकरात कांद्याबरोबर असलेले मोहरी पीक ही नष्ट केले.
पीक काढणी, वाहतूक, नांगरट यावर मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याचे शेतकरी विष्णू इंगळे यांनी सांगितले. कांद्याला कमी दर मिळाल्याने त्यावर ट्रॅक्टर फिरवने मला चांगले वाटले आणि खरीप
हंगामातील दुसरे पीक घेण्यासाठी शेत तयार केल्याचे ते म्हणाले. 4 एकरात कांद्याची लागवड करण्यासाठी सुमारे 2 लाखांहून अधिक खर्च आल्याचे ते म्हणाले.