माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे
७० हजार २१ क्विंटलची संभाव्य गरज विचारात घेतली आहे. पहिल्या टप्प्यात १० हजार २७३ क्विंटल बियाणे उपलब्ध झाली असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी शंकर
किरवे यांनी दिली. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ६ लाख ५० हजार ४४० हेक्टर प्रस्तावित आहे. या हंगामात जिल्ह्यात प्रामुख्याने भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमुग, तीळ, सूर्यफूल,
सोयाबिन, कापूस व इतर पिकांची पेरणी होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खतांची उपलब्धता तसेच बियाणे उपलब्धतेचे नियोजन आखले आहे. कापूस
उत्पादकांसाठी १ जूनपासून बियाणे खरेदी करता येणार आहे. तीन वर्षांत प्रथमच सर्वाधिक २ लाख २५ हजार टन खताचे आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर आहे. त्यापैकी ११ हजार ६३० टन
खतांची पेरणीपूर्वीच विक्रीही झाली. मागील तीन वर्षांतील खत विक्रीचे आकडे पाहिल्यास, दरवर्षी सरासरी ५२ हजार क्विंटल बियाणांची विक्री होते. यंदा २०२२ च्या खरीप हंगामातील
पेरणीसाठी तब्बल ७० हजार २१ क्विंटल बियाणे उपलब्धतेची तयारी कृषी विभागाने केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे १० हजार २७३ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असल्याची माहिती किरवे यांनी दिली.