माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची
भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा प्रश्न मला पडला. पंकजा मुंडे यांना ही कालच्या मोर्चात स्थान देण्यात आले नव्हते. माझे तर म्हणणे आहे, की पकंजा मुंडे यांचा
पक्षात अपमान होत असेल तर अशा पक्षाला लाथ मारून त्यांनी आमच्या पक्षात यावं. त्यांच्यासाठी राष्ट्रवादीची दार खुली आहेत, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी
पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर दिली.मुंबईत नेत्र चिकित्सक तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, आमित देशमुख यांच्यात
लेन्सची चर्चा चांगलीच रंगली होती. या कार्यक्रमाला उपस्थितीत असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या डोक्यात भावाच्या मायेनी धनंजय यांनी मारलेली टपली हा
देखील राज्यात चर्चेचा विषय झाला होता. त्यावेळी आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी आदित्य ठाकरे यांचा दाखला देत पंकजा यांनी महाविकास आघाडीच्या लेन्समधून पाहिलं पाहिजे
असे म्हणत त्यांना राष्ट्रवादीत येण्याची आॅफर दिली होती.त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील तशीच आॅफर पंकजा मुंडे यांना दिल्यामुळे राजकीय
वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना मिटकरी यांनी मनसेकडून शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा अयोध्येतील भाजपचे खासदार ब्रिजभूषण यांच्या
सोबतचा फोटा व्हायरल केला जात आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात कुणी खोडा घातला? असा सवाल उपस्थितीत करत मनसेने शरद पवार यांच्याकडे ऊंगलीनिर्देश केला आहे.
यावर मिटकरी म्हणाले, ३५ वर्ष संसदीय कामाचा अनुभव असलेल्या ब्रिजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येयत येण्यापासून रोखले. उत्तर भारतीयांची माफी मागितल्या
शिवाय पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला. यावर यामागे शरद पवारांचा हात आहे, असा आरोप जर मनसे करत असेल तर मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे. यावरून शरद पवार साहेबांचा
उत्तर प्रदेशातही किती दरारा आहे, हे मनसेच्या नेत्यांनी ओळखून घ्यावे, असा चिमटा देखील मिटकरी यांनी काढला.मराठी, हिंदी,उतर भारतीय, बिहारी असा भेदभाव करणाऱे आमच्यावर
जातीयवादाचा आरोप करतात, हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्यासारखेच झाले, अशी टीकाही मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. रामाचे नाव घ्यायचे आणि पळून जायचे,
असा पळपुटेपणा आमच्याकडे नाही, असे म्हणत मनसेचे नेते अयोध्येत न जाता पळून आल्याचा आरोप देखील मिटकरी यांनी यावेळी केला.