भेंडा(नेवासा)
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी घेऊन समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.
लग्न म्हंटले की मुलीच्या घरच्यांनी अनावश्यक महागड्या वस्तू मुलाकडच्यांना भेट देण्याची प्रथा हल्ली रूढ होत चालली आहे. परंतु आजही मुलीच्या घराच्यांची काळजी घेणारी माणसे आहेत याची प्रचिती काळे-तांबे परिवाराच्या विवाह प्रसंगी आली.नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष कडूभाऊ काळे यांचे पुतणे व भेंडा येथील उद्योजक आबासाहेब काळे यांचे चिरंजीव कृष्णा व देडगाव येथील सोपान तांबे यांनी पुतणी व बाळासाहेब तांबे यांची कन्या चि. सौ.का.वर्षा यांचा विवाह नुकताच कुकाणा येथे संपन्न झाला.
नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूभाऊ काळे यांनी नागेबाबा मल्टिस्टेटच्या माध्यमातून अनेक समाजिक उपक्रम राबवीले असून समाजातील प्रत्येक व्यक्ती सुरक्षित व्हावा म्हणून “नागेबाबा सुरक्षा कवच विमा ” योजना आणली. या योजने अंतर्गत अपघात झाल्यास पॉलिसी धारकला 5 लाख रुपया पर्यंत हॉस्पिटलचा खर्च तसेच अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. घरामध्ये लग्नाची चर्चा चालू असताना चर्चेत नवरदेवाचे भाऊ अक्षय काळे यांनी मुलीच्या संपूर्ण कुटुंबाला नागेबाबा सुरक्षा कवच विमा ” योजने अंतर्गत
विमा पॉलिसी भेट देण्याची संकल्पना मांडली,त्याला कडूभाऊ काळे यांनी लगेच दुजोरा दिला. विवाहाच्या दिवशीच वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा उतरवून जिल्हा परिषद सदस्य दत्तुभाऊ काळे, आबासाहेब काळे व इतर मान्यवरांच्या उपस्थीतीत वधू-वरांच्या हाताने मुलीचे चुलते संजय तांबे, शरद तांबे, सोपान तांबे मुलीचे वडील बाळासाहेब तांबे व पूर्ण तांबे कुटुंब यांना विमा पॉलिसी भेट देण्यात आली.
अनावश्यक भेट वस्तू पेक्षाही तेवढ्याच रकमेचा जीवन सुरक्षित करणारा विमा आपण भेट दिला तर अनेक कुटुंबांना त्याचा आधार होईल असाच आदर्श संदेश काळे परिवाराने यातून समाजाला दिला.