माय महाराष्ट्र न्यूज:शिस्तबद्ध दिंडी म्हणून राज्यात लौकीक असलेला अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील सद्गुरू किसनगिरीबाबा पंढरपूर आषाढी वारी
पायी दिंडी सोहळा यावर्षी पर्यावरण समस्या, स्वच्छतेच्या तक्रारी आदी कारणांमुळे मर्यादीत स्वरुपात काढण्यात येणार असल्याची माहिती श्रीक्षेत्र देवगड देवस्थानच्यावतीने देण्यात आली असून
दिंडी सोहळा प्रस्थानाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.शासनाने यावर्षी करोनाची सर्व बंधने काढून घेतल्यामुळे सर्व दिंड्यांचा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाण्याचा मार्ग मोकळा
झालेला आहे. तथापि गेल्या काही काळा पासून वेगाने होत असलेले नागरीवस्तीचे विस्तारीकरण, दिंड्यांची वाढती संख्या व त्यामुळे निर्माण होत असलेली पर्यावरणाची समस्या, श्रीक्षेत्र पंढरपूर मार्गावरील
ठिकठिकाणच्या नागरिकांच्या दिंडीशी संबंधित स्वच्छतेच्या तक्रारी-त्यांना होणारा त्रास या सर्व गोष्टींचा विचार करून श्री दत्त मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त भास्करगिरी महाराज यांनी कार्यकारी
मंडळाशी प्रदीर्घ चर्चा करून आपला पारंपारिक दिंडी सोहळा थांबवून संस्थानच्या नियमाप्रमाणे या वर्षी अत्यंत मर्यादित स्वरुपात प्रातिनिधिक पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणार असल्याचे स्पष्ट केले.
रविवार दि. 11 जुलै रोजी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार असून याचा लाभ दरवर्षी पालखी सोहळ्यात येणार्या भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.