महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार
सुप्रिया सुळे यांच्यावर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खोचक टीका केली होती. “घरी जाऊन स्वयंपाक करा. तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या”, अशी टीका चंद्रकांत
पाटील यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवरुन मोठा राजकीय गदारोळ बघायला मिळाला होता. विशेष म्हणजे त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्य महिला आयोगाकडे तक्रारदेखील दाखल झाली होती.
त्यानंतर राज्य महिला आयोगाकडून चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले होते. या सर्व घडामोडींनंतर आता अखेर चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करणारं पत्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्यासोबत गेल्या तीन ते चार दिवसांपासून
सुरु असलेल्या टीकेवरुन नाराजी व्यक्त करत भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.आयुष्याची 45 वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Hadicap,
सावली, आई, संवेदना आणि वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या, जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या
पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत 12 महिला आमदार आणि देशाच्या लोकसभेच महाराष्ट्रातून 5 महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल आणि महिलांबद्दल मनात अनादर नसताना
ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दु:ख नाही”, अशा भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय
आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.