माय महाराष्ट्र न्यूज:राजकीय आखाड्यात एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी न सोडणारे दिग्गज राजकारणी ‘सरकारनामा’च्या
वतीने आयोजित केलेल्या क्रिकेटनामा स्पर्धेच्या निमित्त मैदानावर एकत्र आले. पुण्यातील क्रिकेटनामाच्या रणसंग्रामात उतरताच, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या शिवसेनेचे
सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ‘खोचक टोलेबाजी’ केली. यावेळी त्यांनी भाजपचे सुजय विखे पाटील यांच्याबाबत बोलताना ‘यॉर्कर’ टाकून विकेट घेतली.
सुजय विखे पाटील हे भविष्यात धनुष्यबाण हाती घेतील, अशी मिश्किल टिप्पणी नार्वेकर यांनी यावेळी केली.’सरकारनामा’च्या वतीने पुण्यात आयोजित क्रिकेटनामा स्पर्धेचा
थरार पहिल्याच दिवशी अनुभवायला मिळाला. या स्पर्धेच्या निमित्तानं राजकीय पक्ष आणि प्रशासन यांच्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे सामने होत असून, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,
भाजप, मनसे, आम आदमी पक्ष या राजकीय पक्षांसह प्रशासन आणि पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांचे दोन संघ आहेत. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे, भाजपचे प्रवीण दरेकर, विश्वजीत
कदम, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार धैर्यशील माने, ओमराजे निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, अनिकेत तटकरे, महेश लांडगे, सुनील टिंगरे, संजय जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह नेते सहभागी झाले होते.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच राजकीय पक्षांच्या नेत्यांची जोरदार टोलेबाजी केली. क्रिकेटनामाच्या रणसंग्रामात उतरल्यानंतर शिवसेना सचिव नार्वेकर यांनी जबरदस्त सुरुवात केली.
यावेळी त्यांनी भाजपचे सुजय विखे पाटील यांच्याबाबत मिश्किल टिप्पणी केली. सुजय विखे पाटील आणि माझे बोलणे झाले आहे. ते भविष्यात धनुष्यबाण हाती घेतील, असे मिलिंद नार्वेकर म्हणाले.
क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या नार्वेकरांनी सुरुवातीपासूनच जोरदार बॅटिंग केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तगडे खेळाडू शिवसेनेच्या गोटात ओढून घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेसला आपण कधीही आपलेसे करू शकतो, असा मेसेज त्यांनी या ‘खेळी’तून दिला.राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जसे जोरदार बॅटिंग करतात तशी बॅटिंग पुण्यात
शिवसेना करेल, असे नार्वेकर म्हणाले.यावेळी नार्वेकरांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेल्या सचिन अहिरांना
त्यांनी सलामीला फलंदाजी करण्याची संधी दिली. ते शिवसेनेसाठी काय करू शकतात याची परीक्षा घेतली.सचिन अहिर यांनी देखील मिलिंद नार्वेकरांचा विश्वास सार्थ ठरवला. त्यांनी संघाला
चांगली सुरुवात करून दिली. पुढे ते बाद झाल्यावर मैदानात आलेल्या खासदार धैर्यशील माने यांनी संघाची धावसंख्या पुढे नेली.राष्ट्रवादीकडून सलामीला उतरलेल्या आमदार अनिकेत तटकरे यांची विकेट घेतली.
त्यानंतर सुदर्शन पवार आणि किशोर कांबळे यांनी संघाचा धावफलक हलता ठेवला.महापालिकेपासून राजकारणाची सुरुवात करुन दिल्ली गाठण्याचे मानस असलेल्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ
यांना शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांनी पुण्याच्या मैदानावर रोखले.शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर त्यांनी मोहोळ यांची विकेट घेतली.
इथे सर्वांचे जर्सीमधील फोटो काढून ठेवा. कारण हे पुढे कायमस्वरुपी याच संघात राहतील का याची काळजी सरकारनामाने घ्यायची आहे, असे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.
सरकारनामा सर्वांना एकत्र आणत आहे, पण ते उद्या असं पण सांगतील की एकत्र येवून सरकार बनवा. पण मुख्यमंत्रिपद पहिल्यांदा आम्हालाच लागेल, असे सूचक विधान मिलिंद नार्वेकर यांनी केले.
आरोप-प्रत्यारोप, एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढून गढूळ झालेले महाराष्ट्रातील राजकारण शांत करण्यासाठी सरकारनामाची ही स्पर्धा मदत करेल, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.