शेवगाव
साखर कारखानदारांनी डिस्टिलरी प्रकल्प काढल्याने ऊसाला टनाला १०० रूपये जादा भाव देण्याची ताकद निर्माण होणार आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे संघर्षयोध्दा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सुमननगर नियोजित 30 केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी-इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन व बबनराव ढाकणे यांच्या सामाजिक व राजकिय जीवनाकार्यावर आधारीत ‘महाराष्ट्र विधानमंडळातील बबनराव ढाकणे’ या संपादित ग्रंथाचा प्रकाशन समारंभ आज संपन्न झाला. भूमिपूजन व प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास, कामगार मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बबनराव ढाकणे, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, राधेश्याम चांडक, अॅड.प्रतापराव ढाकणे, ऋषिकेश ढाकणे, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले आदी उपस्थित होते.
श्री. पवार पुढे म्हणाले, कोणत्याही कारखान्याचे यशाचे श्रेय जसे मालकाला आहे,त्याहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांनाही आहे. नगर जिल्ह्याला सहकार चळवळीचा वारसा आहे. सर्वाधिक कारखाने या जिल्ह्यात आहेत. भारतात सध्या गहू व साखर या दोन पिकांचे मागणीपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. अशात देशात या दोन्ही पिकांना निर्यात बंदी केली आहे. ही निर्यातबंदी उठविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
यावेळी दृकश्राव्य संदेशांच्या माध्यमातून आपले विचार मांडताना केंद्रीय रस्ते, परिवहन, वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आज साखर धंद्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे . आपली गरज २६० लाख टन आहे. उत्पादन ३६० लाख टन आहे. ४० हजार कोटींची साखर निर्यात करूनही साखर शिल्लक आहे. तेव्हा जास्तीचे साखर उत्पादन न घेता इथेनॉल निर्मिती कडे वळले पाहिजे. शुगर केन ज्युस पासून सिरप निर्माण केले पाहिजे. देशाची २ लाख कोटी रुपये एवढी इथेनॉल अर्थव्यवस्था आहे. देशात फ्लेक्स इंजिनवर चालणारी वाहने निर्मितीस सुरूवात झाली आहे. भविष्यात पेट्रोल ऐवजी १०० टक्के बायोइथेनॉल वापर होणार आहे. तेव्हा कारखान्यांच्या फायद्यासाठी इथेनॉल निर्मिती करा.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,
नुसते साखरेचे उत्पादन घेत साखर कारखाना फायद्यात येणार नाही. यासाठी इथेनॉल व इतर पर्यायी उत्पादन घेणे आवश्यक आहे.असे मत ही राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे व्यक्त केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती कडे वळावे. आजही साखरेला टनामागे ४०० रूपये तोटा सहन करावा लागतो. साखर कारखाना काढणं तोट्याचा व्यवसाय झाला आहे. कारखाना फायद्यात आणण्यासाठी इथेनॉल सारख्या पर्यायी इंधनाचे उत्पादन वाढवावे लागणार आहे.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, ऍड.प्रतापराव ढाकणे, अश्विनी घोळवे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.