माय महाराष्ट्र न्यूज: सध्या महाराष्ट्रात कांद्याच्या दराची देश पातळीवर चर्चा आहे. अनेक बाजार समित्यामंध्ये कांद्याला किमान ५० पैशांवरून १ रुपये
किलोपर्यंत दर मिळत आहे. याबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात रोष आहे. यासाठी पुणतांबे येथे शेतकऱ्यांनी आंदोलनही केले होते. दरम्यान लासलगावच्या
बाजारसमितीमध्ये कांद्याला दर कमी मिळत असला तरी नगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत शुक्रवारी कांद्याला प्रति क्विंटल 1700 रुपयांचा दर मिळाला. बाजार समितीत 11 हजार
205 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1200 ते 1700 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 750 ते 1150 इतका भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 700 रुपये, गोल्टी
कांद्याला 800 ते 1000 रुपये भाव मिळाला.तर जोड कांदा 100 ते 300 रुपये इतका भाव मिळाला.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक ते दोन रुपये किलो
दराने माल विकावा लागत आहे, तर गुजरातचीही अवस्था वाईट आहे. येथील अनेक भाजी मार्केटमध्ये कांद्याचे भाव अत्यंत कमी दरात जात आहेत. शेतकऱ्यांना 2 ते 4 रुपये किलो प्रमाणे कांदा
विकावा लागत आहे परंतु अडते आणि व्यापारी किलोमागे 40 कांद्याला भाव घेत आहेत.गुजरात हे देशातील चौथ्या क्रमांकाचे कांदा उत्पादक राज्य आहे. गुजरातमध्ये देशातील 8.21 टक्के कांद्याचे
उत्पादन होते. बाजारभावावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. आज महाराष्ट्र आणि गुजरातमधील शेतकऱ्यांना सरासरी एक ते चार रुपये किलो दराने
कांदा विकावा लागत आहे. दरम्यान नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनने 2014 मध्येच दिलेल्या अहवालानुसार कांदा उत्पादनासाठी प्रति किलोला 7 रुपये खर्च येतो.
गुजरातमधील कांद्याचे बाजारभाव राजकोटच्या गोंडल मार्केटपेक्षा कांद्याचा किमान भाव 155 रुपये प्रति क्विंटल होता. सरासरी किंमत 455 तर कमाल 930 रुपये होती. राजकोटच्या
जेतपूर मार्केटमध्ये, किमान भाव 100 कमाल 555 आणि सरासरी भाव फक्त 230 रुपये प्रति क्विंटल होता.