माय महाराष्ट्र न्यूज :भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात नेमलेल्या ४८ लोकसभा मतदारसंघप्रमुखांवर निवडणुकीसाठी पक्षाचा नियंत्रण कक्ष स्थापन करायची जबाबदारी सोपवली आहे.
आतापर्यंत भाजपचे उमेदवार आपापल्या मतदारसंघात असा नियंत्रण कक्ष सुरू करीत होते. दरम्यान, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान ५०० सक्रिय कार्यकर्ते जोडण्याचे लक्ष्यही या लोकसभाप्रमुखांकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, पक्षात
कोणालाही प्रवेश देण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेण्याचा सल्ला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वरिष्ठांना दिला आहे.भाजपने पहिल्यांदाच लोकसभा आणि विधानसभाप्रमुख पदे संघटनेत निर्माण केली आहेत. केंद्रीय पातळीवरून
त्या संदर्भात धोरण, कार्यपद्धती ठरवून देण्यात आली आहे. सर्व ४८ मतदारसंघांत लोकसभाप्रमुख नेमण्यात आले आहेत. मित्रपक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तेवढेच काम करणे अपेक्षित असल्याचे या प्रमुखांना सांगण्यात आले आहे. त्यांची लवकरच
पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यात त्यांच्या कार्यपद्धतीविषयी अधिक स्पष्टता दिली जाईल, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार एका अॅपच्या
माध्यमातून या लोकसभाप्रमुखांचा थेट जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क राहणार आहे. आपल्याकडची माहिती ते थेट या नेत्यांशी शेअर करू शकतील. लोकसभा निवडणुकीतील
यशासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करणे हे या प्रमुखांचे पहिले लक्ष्य असेल. त्यानुसार प्रत्येक बूथमध्ये २० पन्नाप्रमुख आणि ११ इतर समित्यांचे प्रमुख असतील. ही फळी तयार करण्याचे कामही या प्रमुखांना करायचे आहे.
पक्षातील आतापर्यंतच्या रचनेनुसार जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांशी अधिकारांच्या मुद्द्यावरून संघर्ष होऊ शकतो, अशी शक्यता चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या बैठकीत काही लोकसभाप्रमुखांनी व्यक्त केली, अशीही माहिती समोर येते आहे.
मात्र, संबंधित पदाधिकाऱ्यांचीही लवकरच बैठक घेण्यात येईल आणि त्यात त्यांना या मतदारसंघप्रमुखांचे काम आणि अधिकार याविषयी स्पष्ट कल्पना देण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती एका पदाधिकाऱ्याने
नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. दरम्यान, येणाऱ्या काही दिवासांमध्ये यावरूनही राजकारण पेटण्याची शक्यता आहे.येईल त्याला सोबत घेण्याचे धोरण मिळालेल्या माहितीनुसार लोकसभाप्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत एका प्रमुखाने
त्याच्या जिल्ह्यात भाजपत आलेल्या काही कार्यकर्त्यांविषयी नाराजी व्यक्त करीत असा प्रवेश देण्याआधी स्थानिकांना विश्वासात घेतले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यावर असे होणार नाही, असे सांगत लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपसोबत
येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जोडून घेण्याचे आदेश केंद्रीय पातळीवरून आले आहेत, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितल्याचेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.