माय महाराष्ट्र न्यूज:नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इमामपूर शिवारात दोन कंटेनरच्या अपघातात कंटेनर चालक ठार झाल्याची घटना घडली आहे.
अपघातानंतर वाहतुकीचा खोळंबा झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इमामपूर शिवारातील भैरवनाथ मळा येथे रविवारी सकाळी सहा
वाजता कंटेनरचा अपघात झाला. रस्त्यावर नादुरुस्त उभ्या असलेल्या कंटेनरला (एम.एच.40 सी.डी. 4460) नगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या कंटेनरने (एम. एच. 05 ए. एम. 7818) पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये कंटेनर
चालक संतोष किसन पिसाळ (वय 45 रा. चोराडे, म्हासुरणे. जि. सातारा) हा मयत झाला आहे.अपघातात चालक हा कंटेनरच्या केबिनमध्ये अडकला होता. स्थानिक नागरिक व इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे, अनिकेत आवारे, सुजय आवारे,
वैभव मोकाटे, मच्छिंद्र आवारे, छोटू आवारे, बंटी आवारे, ऋषिकेश आवारे, सुभाष आवारे, बाबासाहेब मोकाटे यांनी कटावणी तसेच पहारीच्या साहाय्याने जखमी चालकास बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु
उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.अपघाता नंतर दोन्ही कंटेनर रस्त्याच्या दोन्ही बाजूने आडवे झाल्याने संपूर्ण वाहतूक खोळंबली होती. रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. एमआयडीसी
पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रमेश थोरवे, संदीप आव्हाड, सुरज देशमुख, जयसिंग शिंदे, पोलीस हवालदार गिरवले, सुद्रक तसेच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक सुभाष गवते, बोथरे, वाघमारे सहाय्यक उपनिरीक्षक कवडे, भालसिंग, कोडप पोलीस नाईक शेळके,
सईद यांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कंटेनर बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. सुमारे दोन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.