माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बदलण्याची चर्चा मागील वर्षभरापासून सुरू आहे. मात्र यावर पहिल्यांदाच अहमदनगर जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्या चर्चेला उधाण आले आहे.राजेंद्र फाळके म्हणाले, राजकीय व्यापामुळे
अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ येथे काम करण्याबाबत इच्छुक नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना वेळ देता येत नसल्याने नवीन पालकमंत्री द्यावेत अशी मागणी आहे.
त्या अनुषंगाने महिनाभराच्या आत पालकमंत्री बदल होऊ शकतो, असे फाळके यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद पाहता
आणखी एक मंत्रीपद द्यावे अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद भक्कम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगर जिल्ह्यात सहा
आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थावर वर्चस्व आहे. लवकरच होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकांसह अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने पूर्ण
तयारी केली आहे. ज्या भागात जशी परिस्थिती असेल तशी आघाडी-युती करण्याचे पातळीवर नियोजन आहे. मात्र कुठेही भाजप सोबत जाणार नाही हे निश्चित केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, युवक राष्ट्रवादीचे कार्यकार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवक नेते संजय कोळगे यांच्यासह काँग्रेस पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.