माय महाराष्ट्र न्यूज:राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेच शिवसेनेचा गेम केल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला
संपवणार हे भाकीत मी अनेक दिवसांपासून करतोय. राज्यसभेच्या निकालावरून माझे हे भाकीत खरे ठरताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी राष्ट्रवादीचे
षडयंत्र ओळखावे, असे सुजय विखे यांनी म्हटले. ते शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी
चुरस दिसून आली. पुरेसे संख्याबळ नसतानाही शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या विरोधात भाजपने धनंजय महाडीक यांना उमेदवारी दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
यांनी चाणाक्ष खेळी करत महाडीक यांना निवडून आणले आणि मोठा राजकीय भूकंप घडवला. या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीची मते फुटल्याची चर्चा सुरू
असतानाच नगर दक्षिणचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी शिवसेनेचा गेम राष्ट्रवादी काँग्रेसनेच केल्याचा घणाघाती आरोप केला आहे.गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादीकडून शिवसेनेला
संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यसभेच्या निकालाबद्दल अपक्षांना दोष देण्यापेक्षा शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या मताधिक्याकडे पहावे. या निकालावरून राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार हे
माझं भाकीत खरं ठरताना दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीत सुखी आहेत. मात्र, सामान्य शिवसैनिकांसह आमदार खासदार दुःखी आहेत. येणाऱ्या विधान
परिषदेतही शिवसेनेची नामुष्की होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हे सगळं षडयंत्र ओळखावे. माझ्या आजोबांपासून शिवसेनेशी आमचे संबंध आहेत. त्यामुळे मला शिवसेनेबद्दल सहानुभूती आहे. त्यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस पासून सावध रहाण्याची गरज असून राष्ट्रवादी काँग्रेस हा खेळ करणारा पक्ष आहे, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले.