माय महाराष्ट्र न्यूज:कांद्याच्या दरामध्ये सातत्याने होत असलेली घसरण शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडवून टाकण्यास कारणीभूत ठरली आहे. एक नंबर कांद्याला फेब्रुवारी ते मे अखेर पर्यंत
प्रतिक्विंटल जास्तीत जास्त ९०० पर्यंतचा दर मिळाला. तर तीन नंबर कांदा शंभर रुपये क्विंटल दराने विकला गेला. चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गावरान कांद्याला १४०० रुपये पर्यंतचा भाव मिळत आहे.
राज्यात अहमदनगरला प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखले जाते. सरकारने एक फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपयांचे अनुदान घोषित केले.
परंतु मार्चनंतरही कांद्याचे दर समाधानकारक वाढलेच नाहीत. मे अखेरपर्यंत एक नंबरचा कांदा ५०० ते ९०० रुपये दरानेच घेतला गेला. वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा पावसाळ्यापूर्वी कांदा चाळीत भरला. तसेच अतिवृष्टीमुळे
कांद्याचे नुकसान झाल्याने आवकही घटली . जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मात्र कांद्याच्या दरात किरकोळ वाढ झा ली. चार जूनला कांदा ११७५ रुपये प्रतिक्विंटल त्यानंतर १३ जूनला राहुरी बाजार समितीत १४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. वांबोरी उप बाजार
आवारात १७ जूनला वांबोरी उप बाजारात १३ हजार ४०० गोणी कांद्याची आवक झाली. लिलावात एक नंबर कांद्याला १००० ते १३०० चा भाव मिळाला. दोन नंबर कांदा ६०५ ते १००० तर तीन नंबर कांदा १०० चे ६०० रुपये दराने विकला गेला.