माय महाराष्ट्र न्यूज:देशी दारूच्या बाटलीची किंमत जेवढी आहे तेवढे पैसे एक लिटर दुधाला द्या, अशी मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे रयतक्रांती
संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला. त्यादरम्यान सदाभाऊ खोत यांनी ही मागणी केली आहे. सध्या त्यांनी केलेल्या या मागणीची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की गाईच्या दुधाला प्रति लिटरला 75 रुपये भाव मिळाला पाहिजे तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये प्रति लिटरला भाव मिळाला पाहिजे. हे अवघड नाही. महागाई वगैरे काही वाढत नाही उलट
शेतकऱ्याला जर भाव दिला तर महागाई निश्चित कमी होईल. कारण महागाईची ज्यांना झळ पोहचते ती माणसं शेतावर काम करायला येतात, मग शेतकरीच त्यांना दोन पैसे देतो.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला. सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने रहावं. शेतकरी हा कष्टाळू आणि मायाळू आहे. शेतकऱ्याला जर तुम्ही झिडकारलं तर शेतकऱ्याच्या हातात बळी नांगर आहे. हे राज्यकर्त्यांनी कधीही विसरू नये.”
पुढे ते म्हणाले, “गावातील शेतकऱ्यांच्या पोराला आणि शेतकऱ्याला आम्ही जागा करू कारण शेतकऱ्याच्या घामाचे पैसे आहेत. येथील साखर कारखानदारांने खऱ्या अर्थाने ते पैसे दिले नाहीत, पैसे देणे गरजेचे आहे.
पेरणी हंगाम तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत. जर 30 जून पर्यंत पैसे दिले नाही तर एक जुलै रोजी साखर कारखान्याच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करू. त्यावरही कारखान्याने पैसे नाही दिले तर पुढील
आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.