माय महाराष्ट्र न्यूज: नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी
40 पेक्षा अधिक आमदार फोडून बंडाचा झेंडा फडकवला आहे. जवळपास दोन तृतीयांश आमदार शिंदेंसोबत असल्यानं त्यांनी पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. मुख्यमंत्रिपदासह शिवसेना
पक्षप्रमुखपदावरही पाणी सोडावं लागतं की काय, अशी वेळ उद्धव ठाकरेंवर आलीय. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र राज्याचे
दोन तुकडे करायचे आहेत आणि त्यातून दोन वेगळी राज्य तयार करायची आहेत, असं खळबळजनक विधान भाजप नेत्याने केलं आहे. तसंच, या देशात अजून 50 राज्यं निर्माण करण्याची मोदी यांची योजना आहे, असंही ते म्हणाले आहेत.
2024मध्ये नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेवर येतील. त्यानंतर ते देशात नवीन राज्यं निर्माण करतील, असं विधान कर्नाटकचे ज्येष्ठ भाजप नेते उमेश कट्टी यांनी केलं आहे. कट्टी हे कर्नाटक राज्याचे
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. ते म्हणाले की, हा पक्षाचा अजेंडा नव्हता. मात्र, आता हे होईल असं दिसत आहे. जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेत येतील, तसे महाराष्ट्राचे
दोन राज्यात विभाजन करतील. कर्नाटक राज्याचंही तसंच होईल. उत्तर प्रदेशचं विभाजन चार राज्यांत होईल. देशभरात एकूण 50 नवीन राज्यांची निर्मिती करण्याची मोदी यांची योजना आहे, असं कट्टी यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, कर्नाटक हे राज्य देखील उत्तर आणि दक्षिण अशा दोन दिशांमध्ये विभागलं जाईल. आताच्या राज्याची राजधानी बेंगळुरूमध्ये नागरी प्रश्न प्रचंड वाढले आहेत.
त्यामुळे दोन स्वतंत्र राज्य करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे, असंही ते यावेळी म्हणाले.